

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीतील वसई गावात साधारणपणे १९५० च्या दरम्यान क्रिकेट खेळ आजच्या इतकाच लोकप्रिय होता.खरं तर हा खेळ त्या काळात आजच्यापेक्षा जास्त निष्ठेने खेळला जायचा.आणि ख-या अर्थाने क्रिकेटही एन्जाॅय केलं जायचं.वसईतील होळी गावातील एक टीम त्याकाळात त्यांच्यातील कुशल क्रिकेटपटूंमुळे वसईसह तालुक्याबाहेरही प्रसिद्ध होती.वसईतील आक्टन संघ हादेखील त्याकाळी चांगली कामगिरी करीत होता.
एम.जी.वर्तक संघातील होळी येथील प्रसिद्ध राऊत कुटूंबातील कमळाकर हरिश्चंद्र राऊत हा सहा फुटांहून अधिक उंच,सडपातळ व लवचीक बांध्याचा तरूण गावातील क्रिकेट मैदानावर खेळाचा मनमुराद आनंद घेत होता.पुढे हाच तरूण क्रिकेटच्या जोरावर के.एच. या आद्याक्षरांनीच सर्वत्र लोकप्रिय झाला.५ जुलै १९३२ साली जन्मलेले के.एच.राऊत वयाच्या ८८ वर्षापर्यंत क्रिकेटबद्दल भरभरून बोलत होते.मनाने व शरीरानेही ते तंदुरुस्त होते.या अशा क्रिकेटवर जिवापाड प्रेम करणा-या क्रिकेटविराचे २५ सप्टेंबर २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आणी अवघी वसई हळहळली.कमळाकर उर्फ
के.एच.राऊत – वसईचा शेर ए क्रिकेट काळाच्या पडद्याआड गेला.
साठच्या दशकात के.एच.राऊतांनी वसईतील सद्याचं नरविर चिमाजी आप्पा मैदान आपल्या बॅटमधून सिमापार टोलवलेल्या चौकार-षटकारांच्या चेंडूने दणाणून सोडलं होतं.मध्यम व संथगतीतील आऊटकटरच्या अस्त्रानेही फलंदाजांच्या तोंडात बोटे घालायला लावली होती. फलंदाजी असो वा गोलंदाजी मैदाना सभोवती प्रेक्षकांच्या आरोळ्या ह्या जास्त करून के. एच. साठीच ठरलेल्या असायच्या. के. एच. राऊतांनी त्यांच्या उमेदीच्या काळात टाईम्स शील्ड मिल ओनर्स शिल्ड, पुरुषोत्तम करंडक ,पोलीस इन्वीटेशन स्पर्धा, कॉम्रेड शिल्ड, कॉस्मोपाॅलिटन शिल्ड, तालीम शिल्ड, कांगा लिग अशा लोकप्रिय स्पर्धांमधून आपला दबदबा आणि चमक दाखवली होती. वसईतील तालुका पातळीवरील क्रिकेट टूर्नामेंट मध्ये खेळतांना सतत तीन वर्षे बेस्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. आपल्या एम.जी. वर्तक ह्या टीम मधून त्यावेळच्या वसईतील तुल्यबळ आक्टन संघाविरुद्ध खेळताना त्यांनी लागोपाठच्या तीन चेंडूत 3 षटकारांची हॅटट्रिक केली होती. ही त्यांची कामगिरी वसईत आजही अबाधित आहे.क्लाईव्ह लाॅईडनी ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमवरून बॅटने रेल्वेच्या ट्रॅकवर बाॅल भिरकावला होता त्याचप्रमाणे वसईतील चिमाजी आप्पा मैदानावरील दूरवरील उंच ताडाच्या झाडावर के. एच. राऊतांनी चेंडू उतूंग टोलवला होता. ही देखील त्यांची किमया अजून कुणालाच करता आलेली नाही. क्रिकेट के.एच.च्या रक्तातूनच वाहत होतं.
राऊतांनी मुंबईत क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी फिनिक्स मिल्स ची नोकरी पकडली. त्यावेळी एकदा रुईया स्पोर्ट च्या नेटवरील त्यांचा सराव पाहून साक्षात पॉली उम्रीगरांनी वसईतील रणजीपटू सदानंद मोहोळ ह्यांना,’ ये छोकरा कौन है !’ म्हणून विचारलं होतं .त्यावर मोहोळांनी ,’ ये विनू का (विनू मांकड) चेला है!’ असं पॉली काकांना सांगितलं. मिली ओनर्स शिल्डसाठी खेळतांना राऊतांनी फिनिक्स मिल्स तर्फे दिलेलं योगदान अफलातून होतं.त्यांच्या सारख्यांच्याच कामगिरीमुळे फिनिक्स मिल ह्या टूर्नामेंटमध्ये अकरा वेळा फायनलला पोहोचली होती आणि नऊ वेळा विजेती ठरली होती. कांगा लीगमध्ये ‘ए’ डिव्हिजन मधून नॅशनल स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळताना १९६६ साली त्यांनी सुनील गावसकरांच्या दादर युनियनशी दोन हात करून चॅम्पियनशिप मिळविली होती.
राजसिंग डुंगरपूर ह्यांचं लक्ष त्यांकडे होतंच. त्यांनी के.एच.आणि पद्माकर शिवलकर ह्यांना आपला राजस्थानातील डूंगरपुर संस्थानातील ‘बारिया स्टेट टूर्नामेंटसाठी’ निवडलं आणि राजस्थानात नेलं.१९६८ आणि १९६९ अशी दोन वर्षे ते बारिया स्टेट टूर्नामेंट खेळले त्यांच्याबरोबर राजसिंगासह हनुमानसिंग,सलीम दुराणी, सूर्य वीर सिंग असे त्याकाळचे दादा क्रिकेटपटू होते.त्यांच्यासह खेळताना पहिल्या वर्षी के. एच. राऊतांचा अष्टपैलू परफॉर्मन्स होता. चार बळी आणि फलंदाजीत अठ्ठावीस धावा. दुसऱ्या वर्षाची स्पर्धा देखील त्यांच्या संघाने २८ धावांनी जिंकली होती.राऊतांच्या आऊट कटर त्यावेळी फार गाजला होता.खुद्द राजसिंग डुंगरपूर ह्यांनी राऊतांची पाठ थोपटून त्यांच्या कर्तृत्वाला पावती दिली होती.
के.एच.राऊत आणि क्रिकेट हे एक समीकरणच होऊन बसलं होतं.अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. रुईया गोल्ड कप स्पर्धेत दोन वर्षे गोल्ड मेडल त्यांनी मिळवले. टाईम शिल्डमध्ये फिनिक्स मिल संघातून खेळताना न्यू इंडिया इन्शुरन्स संघाची धूलाई त्यांनी १६४ धावा करून केली. टाईम शिल्ड स्पर्धेतील फायनलमधील १५४ या त्यांच्या रेकॉर्डब्रेक धावा आहेत. गोलंदाजीतही त्यांनी टाटा विरुद्ध खेळताना १३ धावात ५ बळी मिळवून टाईम्स टूर्नामेंटमध्ये बॉलींग प्राईज मिळवले होतं. पुरुषोत्तम शिल्डमध्ये खेळतांनाही राऊत यांनी क्रिकेट रसिकांना अशीच आपल्या कामगिरीची मेजवानी दिली होती.ह्या स्पर्धेत फायनल मॅच खेळताना त्यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील मुंबईचा कप्तान हर्डीकर ह्यांच्या एका ओव्हरमध्ये दोन षटकार व एक चौकार घेतला होता. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह राऊत यांचा फार आवडीचा स्ट्रोक होता. एकदा पुरुषोत्तम करंडकात केडेकर, विसू लेले, बोंद्रे, बाळू गुप्ते, सी.डी. पाटणकर या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळतानाच के.एच.चा ७८ धावांवर रिटायर हर्ट व्हाव लागलं. जलदगती गोलंदाज रमाकांत देसाईच्या बाऊन्सरला के.एच.नी जरा अंडर एस्टीमेटच केलं आणि अंदाज चुकून चेंडू त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला. त्या काळी हेल्मेट वगैरेचा आजच्या इतका वापर नसायचा. किंबहुना हेल्मेट नव्हतंच.त्यावेळी के.एच. म्हणतात दोन चार बाॅलनंतर गल्लीतल्या क्षेत्ररक्षकाला मैदानात रक्त दिसलं तेव्हा कळल डोक्याला जखम झालीय म्हणून. सरळ राऊतांची रवानगी बॉम्बे हॉस्पिटल मध्ये झाली.तेथेही ह्या अस्सल वसईकर क्रिकेटपटूने अनॅस्थेशिया न घेता ९ टाके डोक्यात घालून दिले. असा हा निधड्या छातीचा आणि मनाचा क्रिकेटपटू.
के.एच. राऊत ह्यांनी क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने खूप प्रवास केला.भाई नाईक नावाचं त्या काळातील गोव्यातील मोठं प्रस्थ.त्यांनी के.एच.ना मुंबईतील काही क्रिकेटपटूंसह महिनाभराच्या दौ-यासाठी स्थानिक पातळीवरील क्रिकेट खेळण्यासाठी नेलं. गोव्यातील ब-याच संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.त्याहीवेळी राऊतांनी सावंतवाडीतील मैदानावर सर्वात जलद सेंच्युरी ठोकली होती.
आता इतका मुबलक क्रिकेट पूर्वी नव्हतं.परंतु जे काही होतं त्यात जीव आणि कसब ओतुनच ते खेळत जायचं.के.एच राऊतांसारख्या निष्ठावान खेळाडूंनीदेखील कधीच आपल्या मेहनतीची तडजोड केली नाही .म्हणूनच तालीम शिल्रडमधील ‘अ’ गटातील ७६ धावा आणि ३२ धावांतील २ बळी ही कामगिरी तसेच आंतर गिरणी स्पर्धेमधील ७३ धावांतील ५ बळी अशांसारख्या कामगिरी आजही चर्चेचा विषय ठरतात.राऊतांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक रणजी आणि कसोटी क्रिकेटपटूंसह क्रिकेटची मैदाने गाजवली आहेत. जी.एस. रामचंद्र, अजित वाडेकरांसारख्या ख्यातनाम कसोटीपटूंच्या विकेटसही स्थानिक सामन्यांमध्ये काढल्या आहेत.
वसईतील क्रिकेटला मुंबई व देशातील क्रिकेट वर्तुळात ओळख व अस्तित्व देण्यामध्ये के.एच. राऊतांचा सिंहाचा वाटा आहे. क्रिकेटसाठी त्यांनी मेहनतीशी कुठलीच तडजोड केली नाही. तरीही क्रिकेट त्यांच्या अंगातच असल्यासारखे ते क्रिकेट खेळले. दणकट शारीरिक क्षमतेचा पुरेपूर वापर, अचूक टायमिंग आणि चेंडू वरील तीक्ष्ण नजर ह्या आवश्यक गुणांचा त्यांनी आपल्या अष्टपैलू खेळासाठी भरपूर वापर केला, आणि आपली अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळख सिद्ध केली.ह्मुयाळेच ते अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या कौतुकास आणि ज्युनियर खेळाडूंच्या आदरास पात्र ठरले. त्यामुळेच आजही जुनेजाणते क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ञ ‘के.एच.’ नाव काढलं की आदरानेच बोलतात.
सामाजिक कार्यात सहभागी होताना ‘ वसई विकास सहकारी बँक ‘या संस्थेत त्यांनी दहा वर्षे संचालक म्हणून काम पाहिलं. क्रीडा मंडळ वसई या संस्थेच्या कार्यकारी मंडळात ते शेवटपर्यंत सहभागी होते. क्रीडा मंडळाच्या जिमखान्यात नेहमी सायंकाळी कॅरम खेळत आणि विशेष म्हणजे त्यात देखील त्यांनी प्रावीण्य मिळवले होते.असा हा हरहुन्नरी आणि शतकी खेळी करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू ८८ धावांवर बाद होऊन सर्वांच्या मनाला हुरहूर लावून अनंताच्या प्रवासाला कायमचा निघून गेला…..