● कार्याध्यक्षपदी रेमंड मच्याडो, कार्यवाहपदी संतोष गायकवाड, तर उपाध्यक्षपदी योगिता पाटील 

वसई, दि.21(वार्ताहर ) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेवर पुढील तीन वर्षाच्या काळासाठी अध्यक्ष म्हणून ‘लीलाई दिवाळी अंका’चे संस्थापक संपादक, तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांची सर्वसहमतीने फेरनिवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर शाखेचे नवे कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार रेमंड मच्याडो, कार्यवाहपदी नाट्यकर्मी  संतोषकुमार  गायकवाड, तर उपाध्यक्षपदी साहित्यप्रेमी  सौ योगिता पाटील यांच्यासह अकरा जणांचे कार्यकारी मंडळ एकमताने निवडण्यात आले आहे.  

         कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर यांच्या मार्गदर्शनात, तसेच पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार वसई शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा परिषदेचे एक ज्येष्ठ सभासद, तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. कृ. वि. उभाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक सभागृह, पापडी येथे रविवारी सायंकाळी घेण्यात आली. यासभेत शाखेच्या 2022 ते 2024 या कालावधीसाठी नव्या कार्यकारी मंडळाची निवड सर्वानुमताने करण्यात आली.

          या सभेच्या प्रारंभास अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी मनोगत व्यक्त करताना शाखेच्या कार्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. संस्थेचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो यांनी जमा खर्च व अहवाल सादर केला. तसेच आतापर्यंत केलेल्या उपक्रमांचा तपशील दिला . गतवर्षात दिवंगत झालेल्या समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच शाखेचे सभासद यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सन 2022 ते 2024 सालासाठी नवीन कार्यकारी मंडळ निवडीचा प्रस्ताव सभेचे अध्यक्ष प्रा.कृ.वि.उभाळकर सर यांनी मांडला.

           वसई शाखेने आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात अन्यत्र झाले नसतील, अश्या मोठया उंची आणि वलयाचे साहित्यिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल प्रा. उभाळकर यांनी गौरवोद्गार काढले. पहिल्या प्रारंभीच्या वर्षात भरगच्च साहित्यिक उपक्रम राबवून, नंतरच्या कोरोना काळातही स्वस्त न बसता जमेल तसे मराठी भाषा नि साहित्य संवर्धक कार्यक्रम घेतच राहणाऱ्या अनिलराज रोकडे आणि रेमंड मच्याडो यांची नांवे अनुक्रमे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदासाठी सुचवत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. त्यास सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली.

             त्यानुसार प्रारंभी अनिलराज रोकडे यांची अध्यक्ष म्हणून, तर रेमंड मच्याडो यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर चर्चा करीत आणि खेळीमेळीने अन्य कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये संतोषकुमार गायकवाड (कार्यवाह), सौ. योगिता पाटील (उपाध्यक्ष), सिडनी मोरायस (कोषाध्यक्ष), आनंद गदगी (जिल्हा प्रतिनिधी), तर कार्यकारीणी सदस्य म्हणून शेखर धुरी, लेस्ली डिसील्वा, सौ. अस्मिता क्रीस्टो, विजय खेतले व सौ. सुषमा राऊत या सभासदांच्या निवडी करण्यात आल्या. वसई कोमसापवर प्रदीर्घकाळ सक्रियपणे कार्य करणाऱ्या, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पाटील(तरखडकर) यांनी यावेळी मोठ्या पदावर देण्यात येणारी नियुक्ती विनम्रपणे नाकारली. त्यामुळे पाटील आणि उभाळकर सर यांना सर्वानुमते सल्लागार म्हणून कार्यकारिणीवर मानद स्थान देण्यात आले आहे. शेवटी अनिलराज रोकडे यांनी पुन्हा टाकलेल्या विश्वासाबद्दल उपस्थितांचे आभार मानून, पुढील काळात वसईत अधिकाधिक साहित्यिक उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *