
काव्यस्पर्धेत प्रीती भोईर सर्वप्रथम, तर वैभव कानिटकर द्वितीय आणि डॉ. महादेव ईरकर तृतीय पुरस्काराने सन्मानित
वसई, दि.10(प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषदेची वसई शाखा आणि मात्रे परिवार (वासळई) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यप्रेमी स्व. हरिभाऊ म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य््साधून बुधवारी वसई शेतकरी सहकारी सोसायटी सभागृह, देवतलाव येथे काव्यसंमेलन व काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात साहित्यिका नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, तर विशेष अतिथी म्हणून को.मा.सा.प.चे माजी केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर उपस्थित होते. यावेळी झालेल्या कविसंमेलन, तथा काव्य स्पर्धेत ठाणे - पालघर जिल्ह्यतील तब्बल 60 कविंनी भरगच्च प्रतिसाद दिला. अटीतटीच्या झालेल्या या काव्यस्पर्धेतील विजेत्या प्रीती भोईर यांना सर्वप्रथम, तर वैभव कानिटकर यांना द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले. तसेच डॉ. महादेव ईरकर यांना तृतीय क्रमांकाने, तर किशोर पवार व अमोल नाईक यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी साहित्यप्रेमी स्व. हरिभाऊ मात्रे यांच्या आठवणींवर आधारित मान्यवरांचे लेख असलेल्या ‘स्नेहांकित’ या स्मृतिग्रंथाचे आणि वसईतील ख्यातनाम सनदी लेखापाल अनादि भसे यांच्या ‘सतरंगी’ या काव्यसंग्रहाचे या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कवियत्री नीरजा यांनी अध्यक्षीय भाषणातून नवोदित कवींना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्याप्रमाणे कोळ्याला गळाला मासे लागण्यासाठी धडपड करावी लागते , त्याचप्रमाणे कविता सहज निर्माण होत नाही, तर तीला स्फुरायलाही अवधी लागतो. मोठया कविंच्या कविता वाचून, त्यांचा अभ्यास करा. विचार, आचारपूर्वक लिहा आणि आपणच आपल्या कवितेचे समीक्षक व्हा, असा सल्ला सुद्धा नीरजा यांनी यावेळी दिला. कार्यक्रमात कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या कवितेचा प्रवास सविस्तर उलगडून दाखवला. विविध कविता सादर करीत, म्हात्रे यांनी साहित्यावर प्रेम करणारे अलौकिक व्यक्तिमत्व या शब्दांत स्व. हरिभाऊ मात्रे यांच्या कार्याचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण विकास वर्तक यांनी केले. त्यांनी आपले स्वसूर स्व. हरिभाऊ मात्रे यांच्या कौटुंबिक आठवणी आणि कार्याचा आढावा घेतला. त्यांचा साहित्य, ग्रंथालय अशा विविध क्षेत्रात त्यांनी विपुल कार्य केल्याचे सांगितले. प्रा. अशोक ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व. हरिभाऊ मात्रे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. को.म.सा.प. वसईचे कार्याध्यक्ष रेमंड मच्याडो, स्व. हरिभाऊंचे सुपुत्र गिरीश म्हात्रे, पत्नी श्रीमती नलिनी म्हात्रे, कन्या सौ वंदना वर्तक प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. एकूण ६० कवींनी भाग घेतला. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे: प्रथम क्रमांक - प्रीती भोईर (आयुष्याचे प्रगतीपुस्तक), द्वितीय क्रमांक - वैभव कानिटकर (राधा ठोते), तृतीय क्रमांक – डॉ. महादेव ईरकर (वेदनेच्या शब्दकळा), उत्तेजनार्थ - किशोर पवार व अमोल नाईक यांना मिळाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गझलकार ज्योती बालिगा-राव व ख्यातनाम कवी डॉ. सखाराम डाखोरे यांनी पाहिले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी , तर कविसंमेलनाचे निवेदन सौ शिल्पा परुळेकर पै आणि सौ सुषमा राऊत यांनी केले.
कोमसापचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे आज आकस्मित आलेल्या अडचणीमुळे हजर नसल्याचे सांगून, वंदना वर्तक यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच दरवर्षी आपण असाच कार्यक्रम करू, असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमासाठी को.म.सा.प. वसई शाखेचे सर्व पदाधिकारी, मात्रे परिवार सदस्य, वसई शेतकरी सोसायटीचे कर्मचारी व ट्रस्टी यांनी अथक परिश्रम घेतले.