
विरार-वादग्रस्त निर्णयामुळे सध्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. चर्चेत आहेत.विशेष म्हणजे पालिकेतील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच ते एककल्ली कारभार हाकत आहेत. त्यामुळे वसई विरार पालिकेत आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष उभा राहिला आहे.कोरोना सारखे संकट उभे असताना आयुक्तांनी वसई-विरारमधील जनतेशी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे.परंतु तसे न करता गंगाधरण डी. हे मनमानी पणे वागत आहे. त्यातच काल त्यांनी बविआच्या एका नगसेविकेलाही अपमानास्पद वागणूक दिल्याने
आयुक्त व लोकप्रतिनिधीमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वसई विरार क्षेत्रातील कोरोना ची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याबाबत तसेच म्हाडा वसाहतीमध्ये उभारलेल्या विलगीकरण सेंटर मधील असुविधांबाबत निवेदन देण्यासाठी
पालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रभाग क्र.१६ च्या नगरसेविका रिटा सरवैया गेल्या होत्या. परंतु आयुक्तांनी त्यांची भेट नाकारत
सुरक्षारक्षकांमार्फत पालिकेच्या कार्यालयाबाहेर बाहेर काढले. त्यामुळे एका महिला नगसेविकेस अपमानास्पद वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत असून आयुक्त हेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास जबाबदार असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.
रिटा सरवैया यांनी दैनिक महासागर कडे बोलताना सांगितले की, वसई विरार शहर सध्या रेड झोन मध्ये असून शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.काल सायंकाळपर्यंत शहरात कोरोनाबधितांची संख्या ४००पार झाली आहे.यातील १५ जणांचा मृत्यही झाला आहे. परंतु पालिकेकडून रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.त्यातच रविवारी विरार येथे काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडल्या नंतर हा भाग सील केला नसल्याच्याही नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी बैरिकेड्स उपलब्ध होत नसल्याचे कारण दिले. अशा घटना रोजच होत आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या कुटूंबाला विलगीकरणासाठी न्यायचे झाल्यास एका रुग्णवाहिकेत ५ पेक्षा अधिक जणांना घेऊन जाता येत नाही. तरीही पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच रुग्णवाहिकेत कोंबून पालिकेचे कर्मचारी नेत असल्याचे सरवैया यांनी स्पष्ट केले.
विलगीकरणकेंद्रात असुविधा
गंभीर बाब म्हणजे विरार येथे म्हाडा कॉलनीत उभारलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.त्यांचे पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अतोनात हाल होत आहेत.याठिकाणी जेवण सोडा पाणीही दिले जात नसल्याचे समोर येत आहे.सुरवातीला लहान मुलांना दूधही दिले जात नव्हते.अनेक विनंत्या केल्या नंतर आता तीन दिवसाआड दूध मिळत आहे. तेही पाण्यासारखे.तसेंच जे जेवण यांना दिले जात आहे,त्याचा दर्जाही अतिशय खराब असून तेही वेळेवर मिळत नाही.शिवाय साफ सफाई सुद्धा योग्य नसल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे जेल मध्ये ठेवल्या सारखी भावना म्हाडा कॉलनीत विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या लोकांची आहे.
कोरोनाबधितांची लूट
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिद्धी विनायक रुग्णालयात शासकीय वार्ड मध्ये भर्ती असलेल्या कोरोना रूग्णांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याची बाबही सरवैया यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे.या रुग्णांना खाजगी वार्ड मध्ये उपचार घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची लूटमार आहे. दुसरीकडे देशात कोविड सेंटर वाढविले जात असताना वसई विरार पालिकेने बोलींज येथील कोविड सेंटर अचानक बंद केले आहे. त्यामुळे विरार मधील संशयित रूग्णांना थेट वालीव किंवा खाजगी लॅब मध्ये टेस्ट करण्यास सांगितले जात आहे.
अशा प्रकारच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता रिटा सरवैया
यांनी व्यक्त केली