प्रशासनातील काही अधिकारी या गंभीर परिस्थितीमध्ये माणुसकीला विसरलेले आहेत… रेशनिंग दुकानदारांकडुन लोकांना त्यांच्या हक्काचे पुर्ण धान्य मिळत नाही.. रास्तभाव दुकानदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध लपलेले नाही…आणि त्यामुळे भीतीपोटी कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही… अशीच आज दिनांक 07 एप्रिल 2020 रोजी नालासोपारा पुर्व प्रगतीनगरमधील रेशनिंग दुकानात घडलेल्या घटनेची मला माहिती मिळाली..या रेशनिंग दुकानाची मालक एक महिला आहे ती फार खतरनाक आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे..त्यामुळे तिची तक्रार कुणीही करत नाही…ही महिला कमी धान्य देते…अशा परिस्थितीमध्येसुद्धा या दुकानात पावतीपेक्षा कमी धान्य दिले जात आहे…

याच नालासोपारा पुर्व प्रगतीनगर व परिसरामध्ये जवळपास 250 पेक्षा अधिक कुटुंबे अशी आहेत ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, गरीब, मजुर अशी ही लोक सध्या खुप अडचणीत आहेत…काही जण लाजेखातर पुढे येत नाहीत. याबाबत मी मा. तहसिलदार किरण सुरवसे यांना फोन केला त्यांनी दुर्लक्ष केलं… मी स्वत: शनिवार दिनांक 04 एप्रिल ला पुरवठा अधिकारी कापसे यांना भेटलो..त्यांना पत्रासोबत कुटुंबांची यादी दिली.. अजुनपर्यंत यांच्यामार्फत आवश्यक मदत मिळालेली नाही… तलाठींना फोन केला त्यांनी त्यांच्या परीने मदत केली…परंतु त्यांच्या हाथ बांधले असल्याचे जाणवले… त्याचं मोठं कारण तहसिल कार्यालयातुन समाधानकारक उत्तर दिलं जात नाही.. त्याचबरोबर प्रगतीनगरमध्ये काही लोक पोटाची आग मिटवण्यासाठी जेवणाच्या शोधात बाहेर पडतात…तर त्यांचं काय चुकते…पोलीस अशा महिलांना शिवीगाळ…दमबाजी… देताना दिसत आहेत… हे सर्व स्वत:च्या डोळ्याने बघणारे आमचे सहकारी कैलास जाधव जेव्हा याबाबत माहिती दिली..तेव्हा अक्षरश: माझे डोळे भरुन आले…. हा माणुस त्या ठिकाणी चार दिवसांपासुन तलाठीच्या सहकार्याने एक वेळचे जेवण सांगितलेल्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था करुन जेवण घेऊन येतो…वाटप करतो…नेहमीच जेवण कमी पडते…यादरम्यान या माणसाने पोलीसांचा मारही खाल्ला…आज तर जेवणच आलं नाही कारण त्या तलाठींची तडकाफडकी बदली करण्यात आली…हे कोणी व का केलं काहीही कळलं नाही, नायब तहसिलदार श्री प्रदिप मुकणे यांना फोन करुन विचारले तेव्हा त्यांनी फक्त बघतो सांगितलं पण अजुनपर्यंत काहीच केलं नाही….त्या वार्डचे नगरसेवकांनी ठराविक सोसायटीत धान्य वाटप केले..आम्हाला दिले नाही अशी तक्रार तिथल्या रेशनिंग कार्ड नसलेल्या गरीब लोकांनी केली, आज ही लोक कैलासला सतत फोन करत आहेत… दिवसा जेवण भेटत नाही रात्रीचे जेवण तरी द्या…लहान मुलं आहेत…उपाशी कशी झोपणार… असं बोलणारी महिलेची रिकॉर्डिंग तसेच अधिकारींशी व लोकप्रतिनिधींशी वेळोवेळी फोनवर झालेलं संभाषण रिकॉर्डिंग आमच्याकडे आहे… कैलासला वाटलं मुकणेसाहेब काहीतरी करतील…त्यामुळे तो सर्वांना धीर देत होता…मुकणे साहेबांनी जेवणाची व्यवस्था करु शकत नाही हे सांगितलं नाही…आणि जेवणाची व्यवस्थाही केली नाही…शेवटी कैलास गाडी खराब झाली आज येणार नाही, आज जरा सांभाळुन घ्या असं लोकांना सांगू लागला…शेवटी त्याने काही मित्रांना, आजुबाजुच्या काही लोकांनी एकत्र येऊन पैसे जमा केले रात्री 11:30 ला जेवण तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले ..या गंभीर परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या अशा वागण्याने खुप वाईट वाटते…मुकणे नाव पुरवठा अधिकारी असताना खुप गाजलेलं आहे निरंतर बरीच वर्ष ही व्यक्ती पुरवठा अधिकारी म्हणुन वसईला होती बरेच आरोप यांच्यावर झाले…परंतु यांची वरपर्यंत पोहच असल्याने त्यांचं कोणीही काहीही करु शकला नाही…अशी चर्चा आहे… आजही पुरवठा अधिकारी कापसे असताना जेवणाची व्यवस्था मुकणेंकडे कशी काय? कळलं नाही. जेवणाची व्यवस्था होत नाही याबाबत मी उपविभागीय अधिकारी यांनाही कळवलं त्यांच्याकडुन कोणतेच उत्तर नाही… कलेक्टर साहेबांनाही ही बाब व्हॉटसअपद्वारे निदर्शनास आणुन दिली आहे … हे प्रशासन अजुनही लाल फितीतून बाहेर पडायला मागत नाही असं स्पष्ट दिसते.. अशा प्रशासनाला जाब विचारणार कोण? आज महिला, लहान मुले कोरोना विषाणुने न मरता भुकेने कुपोषणाने नक्कीच मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीमध्ये लोकांना अतोनात त्रास होत असताना मगरगठ्ठ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी जर मदत करायचं सोडुन असं वागत असतील तर हे आपल्या सर्वांसाठी फार दुर्देवी आहे. याचा विचार मानवतेच्या दृष्टीने सर्वांनीच करायला हवा…

आज संपुर्ण भारतात जैविक युद्धाची स्थिती आहे…प्रत्येक व्यक्ती अडचणीत आहे..काहीं इतर आजारा़मुळे त्रस्त आहेत… काही हार्ट पेशंट बंद रुममध्ये राहुन व्यथीत आहेत…बरेच जण घरात राहून मानसिक रुग्ण होत असल्याचे समजते…मोठया संख्येने लोक उपाशी आहेत… संपुर्ण देशात मोठे संकट आहे..यावेळी वैद्यकीय टीम, पोलीस, मिडिया आणि इतर बरीच यंत्रणा जीव ओतुन काम करताहेत…परंतू काही ठिकाणी अजुनही काही मुजोर प्रशासकीय अधिकारींमुळे लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.. शेवटी कुणीच कायमस्वरुपी येथे राहण्यास आला नाही..सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडायचंच आहे..तर याची जाणीव ठेवून आपण सर्व या मोठ्या संकटाला एकत्रपणे सामोरे जाऊन लढाई जिंकुया एवढंच माझं म्हणणं आहे… धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *