प्रतिनिधी
कोरोनाशी सुरू असलेला सामना जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या सामन्यातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहे. या सामन्याच्या क्रीडांगणाची व्याप्ती रस्त्यापासून घरापर्यंत आहे. पण आता या सामन्यात खऱ्याखुऱ्या खेळाडूंनीही सक्रीय सहभाग घेतला आहे. वसई-विरारमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात थेट रणजी खेळाडूंनी सहभाग घेत कोरोनारुग्णांसाठी रक्तदान केलं आहे. त्यांच्या सहभागामुळे नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण असून भरभूर प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ९१ खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.

विवा महाविद्यालय, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, अवर्स क्रिकेट क्लब यांनी जे. जे. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने वसई-विरारमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि अवर्स क्रिकेट क्लब या दोन्ही संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून तो भरून काढण्यासाठीच हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. यात विवा महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.

या रक्तदान शिबिरात वसई-विरार टप्प्यातील ९० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपलं योगदान दिलं. यात विनायक भोईर आणि रॉयस्टन डियाझ या रणजी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याशिवाय २५० पेक्षा जास्त कुटुंबांनी पुढे येत आपला वाटा उचचला आहे. विवा महाविद्यालयाजवळ या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान शिबीर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगची पुरेपूर काळजी घेतल्याचं रक्तदात्यांनी सांगितलं.

खेळाडूंबरोबरच विवा महाविद्यालयाचे खजिनदार शिखर ठाकूर, स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांनीही रक्तदान केलं. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही या शिबिरात सक्रीय सहभाग घेतला. ‘कोरोनाच्या या कठीण प्रसंगात सगळेच आपापल्या परीने मदत करत आहेत. अशा वेळी वसई-विरारमधील MCAशी संलग्न असलेल्या या क्लबनी पुढाकार घेत या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, याचं आम्हाला कौतुक आहे,’ असं मत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी व्यक्त केलं.

रक्तदानासाठी आम्हाला मिळालेला प्रतिसाद खरंच खूप उत्साहवर्धक होता. कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेर पडतील की नाही, याबद्दल आम्हाला शंका होती. पण वसई-विरारकरांनी ही शंका खोटी ठरवली. सगळ्या वयोगटातील खेळाडूंनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनीही रक्तदान केलं. MCAशी संलग्न असलेले क्लब अशा उपक्रमांमध्येही हिरहिरीने पुढाकार घेतात ही बाब आमच्यासाठी खरंच अभिमानाची आहे, अशी प्रतिक्रिया MCAचे अपेक्स कौन्सिल मेंबर अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केली.

जेजे रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात विवा महाविद्यालयाच्या विश्वस्तांनीही सहभाग घेतला. ९१ खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमीनीं सहभाग घेत २५० पेक्षा जास्त बाटल्या रक्त या शिबिराच्या माध्यमातून गोळा करण्यात यश आलं. हा आकडा मागणीच्या तुलनेत छोटा असला, तरी कोरोनाविरोधी लढ्यात वसई-विरारकरांचं हे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *