संशयित रुग्णांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता स्वतः हुन पुढे येऊन निदान करून घ्यावे!

जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

 

पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तीचे विलागिकरण व उपचार करणेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत कोव्हीड केअर सेंटर ची व्यवस्था करण्यात आली असून यात बाधित व्यक्ती अथवा रुग्णांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नसून पूर्णतः मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार दिले जात आहेत. संशयित रुग्णांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता स्वतः हुन पुढे येऊन निदान करून घ्यावे जनतेने कुठलेही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्यास ते ग्राह्य धरू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित ३२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून मृत्यू टाळण्यासाठी जास्तीत जास्त बाधित व्यक्तींचा शोध घेणे व त्याचे विलागीकरण करणे तसेच त्यांच्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला कोरोना ची लक्षणे आहेत अशा संशयित व्यक्तींनी घाबरून न जाता लवकर उपाचार करुन घ्यावेत म्हणून स्वतःहून कोरोना चाचणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव असला तरी रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.या बाबतीत जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च म्हणून नगरपालिका आणि महानगरपालिका यांना देण्यात येईल असे केंद्र सरकारकडुन जाहीर करण्यात आले आहे, म्हणून जनतेला विनंती आहे की आपण जागरूक राहावे.महानगरपालिका नगरपालिका,पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात आहेत व त्यानुसार शोध घेत आहेत.

वरील प्रकारचा अत्यन्त चुकीचा व खोटा संदेश व्हाट्सपवर आणि इतर सामाजिक माध्यमा मध्ये फिरत असून अशी कुठलीही बाब केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कोरोना संक्रमण नियंत्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न रात्रंदिवस करीत आहे. परंतु अशा प्रकारच्या अफवांमुळे या प्रयत्नात अडथळे निर्माण होत असल्याने अशा प्रकारचे फेक संदेश पाठविणाऱ्या व्यक्ती तसेच असे संदेश पुढे पाठविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.असा इशारा जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *