
कोळी युवाशक्ती संघटनेने रविवारी वसई मच्छिमार संस्थेत आयोजित केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला दहावी, अकरावी, बारावी आणि त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
करिअर गुरू श्री . प्रकाश* आल्मेडा* यांनी शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीची माहिती दिली. कोणत्या अभ्यासक्रमाला किती व्यवसायमूल्य आहे. त्याची माहितीही त्यांनी दिली. मोबाईल मधील निरूपयोगी गोष्टींमध्ये न अडकता मोबाइलचा वापर करिअर घडवण्यासाठी कसा करता येईल, हेही त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणासह स्पष्ट केले. मच्छिमार समाजातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. या टॅलेंटला खतपाणी मिळून योग्य दिशा देण्याची गरज आहे. या शिबिराच्या माध्यमातून कोळी युवाशक्ती संघटना मुलांमधील टॅलेंटला दिशा देण्याचे काम करत आहे, ही समाजाच्या खूप हिताची बाब आहे, असेही प्रकाश आल्मेडा म्हणाले.
दुसऱ्या सत्रात वसईचे माजी आमदार श्री. विवेक पंडित यांनी पोलिस कायदा आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मार्गदर्शन केले. पोलीस दलाची स्थापना, व्यवस्थेकडून पोलिसांचा होणारा गैरवापर, पोलिसांकडून नागरिकांवर होणारा अन्याय याचीही माहिती त्यांनी दिली.तिसऱ्या सत्रात मूळचे उत्तनचे आणि सध्या नानभाट चर्च येथे प्रेषितीय कार्य करणारे फा. अशली भंगा यांनी जीवनातील ध्येयावर बोलतानाच व्रतस्थ जीवन जगणारे धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर जीवन व्यर्थ आहे. जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर एक निश्चित ध्येय ठेवा. भान ठेवून ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी बेभान होऊन परिश्रम करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विविध महापुरुषांची उदाहरणेही त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवली. जगात कुठेही जा, जीवनात कितीही प्रगती करा, पण आपल्या समाजाला विसरू नका, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
संध्याकाळी अखेरच्या सत्रात स्टॅनले पॉल यांनी संवाद कौशल्य, देहबोली (body language ) यावर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये अत्यंत सोप्या आणि हलक्या फुलक्या शब्दात मार्गदर्शन केले.कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष श्री. मिल्टन सौदिया यांनी प्रास्ताविक केले. पूर्वी शिक्षणाबाबत पालक आणि विद्यार्थी फारसे जागरूक नव्हते. मात्र आता शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे सर्वाना समजले आहे. जसजसे उद्योग क्षेत्र विस्तारत आहे, तसे नवीन अभ्यासक्रम विकसित होत आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात प्रचंड संधी निर्माण होत आहेत. मात्र कोणत्या अभ्यासक्रमाला किती व्यवसाय मूल्य आहे, याबाबत मुलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा संभ्रमाच्या स्थितीत योग्य वेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी कोळी युवाशक्ती संघटनेने हे शिबीर आयोजित केले आहे, असे श्री. मिल्टन सौदिया यांनी प्रस्ताविकात सांगितले. फा. विश्वास दुमाडा यांची प्रार्थना आणि आशीर्वादाने शिबिराला सुरुवात झाली. फा. फ्रांसिस डाबरे यांनी शिबिराच्या आधी चर्चमधून शिबिराची घोषणा करून सहकार्य केले. फा. निलेश तुस्कनो यांनीही युवासंघटनेच्या युवक युवतीना या शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करून सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कोळी युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. अर्नाळा तसेच वसईतूनही काही विद्यार्थी या शिबिराला उपस्थित होते.



