

प्रतिनीधी : कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खासगी रुग्णालयातील 80% खाटा शासकीय दरपत्रकांनुसार अधिगृहीत करण्याचे आदेश दिले होते. अशावेळी बहुतांशी खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशाला महत्व न देता अवाजवी देयक रुग्णांना दिल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. महाराष्ट्र सरकार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविड रुग्णांकरीता उपचारासाठी मोफत सोय उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य म्हणून गवगवा करण्यात आला होता परंतु सत्य परिस्थिती पाहता कोविड रुग्णांच्या संख्येपैकी 1% रुग्णांना देखील या योजनेचा लाभ या रुग्णालयांनी दिला नाही. एकप्रकारे सरकारी आदेशाला केराची टोपली या खासगी रुग्णालयांनी दाखविली. मुखपट्टी, पीपीई किट्स, ऑक्सिजन वगैरेच्या दरआकारणी वरुन रुग्णांची आर्थिक लूट होऊ लागली व अशा रुग्णालयांवर नेमलेल्या शासकिय लेखापरीक्षण समिती ची भूमिका संशयास्पद असल्याचे आढळून येत आहे.
एकंदरीत पाहता शासनाच्या आदेशाच पालन होताना दिसत नाही अशातच खासगी रुग्णालयांना त्यांचे दर वाढवण्याची मागणी “आयएमए” डॉ संघटनांच्या वतीने होऊ लागली आहे. रुग्णांचे आर्थिक शोषण बंद करावे. सात महिन्यांपासून टाळेबंदीच्या काळात लोकांचे रोजगार बुडाले असून आर्थिक टंचाईचा सामना या नागरीकांना करावा लागत आहे. सरकार जबाबदारी घेतेय पण सरकारी आदेशाचे पालन होत नाही यासाठी रुग्णांसाठी सदैव झटणारे आमची वसई चे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे जी यांना निवेदन देउन सरकारी निश्चित दरपत्रक 50% ने कमी करून कोविड रुग्णांकरीता उपचारासाठी सोय उपलब्ध व्हावी यासाठी मागणी केली. कोरोनावर लस बाजारात येत नाही तो पर्यंत सरकारी दरपत्रकांचे दर 50% नी कमी व्हावेत. त्यासंबंधीत अवलंबून असणाऱ्या सर्व प्रकारच्या बाबींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यावर सरकारने प्रामुख्याने भर द्यावा व आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलावी.
“माझे कुटूंब, माझे आरोग्य” या आवाहनाला स्मरून शासनाने सरकारी दरपत्रके 50% कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास आमची वसई चे अध्यक्ष श्री हृषिकेश वैद्य गुरुजी यांनी व्यक्त केला.
स्वँब टेस्ट, प्लाझ्मा इ चाचणींच्या किंमतीत जशी घट झाली तशी कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी निश्चित केलेले शासकीय दरपत्रकांत 50% नी घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे मत रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले.