

वसई – प्रतिनिधी – मागील 7 महिने करोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे. पूर्ण जग या जागतिक महामारीने त्रस्त झाला आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा फटका अनेक उद्योग व्यवसायाला बसलेला आहे. यातून दिवाळी अंक सुद्धा वाचलेला नाही अनेक संपादकांनी यंदा दिवाळी अंक काढण्याचे धाडस केले नाही अशा भयावह परिस्थिती देखील तुषार दिवाळी अंकाने आपला 14 वा अंक प्रकाशित करून दिवाळी अंकाचे सातत्य टिकवून ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे असा उल्लेख तुषार दिवाळी अंकाच्या प्रकाशन समयी लायन क्लब वसई युनिट चे अध्यक्ष लायन दीपक बडगुजर यांनी केला.
तुषार दिवाळी अंक 2020 चा शानदार प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी सायं 5 वाजता वसई पश्चिमेकडील उमेळा फाटा येथे संपन्न झाला. यावेळी प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लायन दीपक बडगुजर, प्रख्यात ज्योतिषाचार्य डॉ. सुधाकर कुडू , ज्येष्ठ कवयित्री वैजयंती माला मदने , दैनिक आपला उपनगरच्या संपादिका अनिता घायवट अंकाचे संपादक डॉ. अरुण घायवट उपसंपादिका संध्या गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी उपस्थित होते. यावेळी चरण घांयवट यांनी प्रास्ताविक मध्ये अंका बाबत सविस्तर माहिती दिली तर यंदाचा अंक काढताना खूप कसरत करावी लागली ही खंत संपादक अरुण घायवट यांनी व्यक्त केली. लॉक डाऊन मध्ये अंक काढणे तसे जिकरीचे काम मात्र अंकाच्या सातत्य मध्ये खंड पडता कामा नये तसेच नवोदित साहित्यिकांची हिरमोड होऊ नये म्हणून अंक प्रकाशित करावाच लागल्याची माहिती संपादक डॉ. घायवट यांनी दिली.