

विरार प्रतिनिधी : कोविड-१९ चा रुग्ण प्रथम अथवा द्वितीय टप्प्यात असेल तर बरा होतो; मात्र रुग्ण तृतीय टप्प्यात गेल्यास त्याला वेंटिलेटर, आयसोलेशन आणि टॉसिलिझमैब या इंजेक्शनशिवाय पर्याय राहत नाही, परंतु टॉसिलिझमैब इंजेक्शनची बाजारात सुरू असलेली काळाबाजारी लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने या इंजेक्शनचा संचय करून दारिद्रय व मध्यम वर्गीय रुग्णाना ही इंजेक्शन कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास या रुग्णाना दिलासा मिळेल, असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.
‘टॉसिलिझमैब’ या इंजेक्शनची ‘एमआरपी’ किंमत ४५ हजार रुपये इतकी आहे. मात्र खासगी हॉस्पिटल व डिस्ट्रीब्यूटर हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध नाहीत सांगून रुग्णाना वेठीस धरतात; मात्र मागच्या खिड़कीतून हेच इंजेक्शन ७० ते ८० हजार रुपयांना या रुग्णाना विकतात. हे सामान्य रुग्णाना परवडणारे नाही, असे सामाजिक कार्यकर्ता निमेश वसा यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे वसई-विरार महापालिकेने किमान १०-१५ इंजेक्शनचा संचय करून ठेवावा व ही इंजेक्शन किमान किमतीत दारिद्रय व मध्यम उत्पन्न गटातील रुग्णाना मोफत उपलब्ध करून द्यावीत; जेणेकरून या रुग्णाचे प्राण वाचू शकतील, असे निमेश वसा यांचे म्हणणे आहे.
दरम्यान; हे इंजेक्शन विकणाऱ्या डिस्ट्रीब्यूटर आणि या डिस्ट्रीब्यूटरने ही इंजेक्शन कोणकोणत्या हॉस्पिटलला विकली आहेत; याची माहिती जाणून घ्यावी. त्यामुळे यांना इंजेक्शनची काळाबाजारी थांबेल, अशी सूचनाही निमेश वसा यांनी आयुक्तांना केली आहे.
विशेष म्हणजे वसई-विरार महापालिकेने कोविड-१९साठी शासकीय दराने सेवा देणाऱ्या सहा खासगी रुग्णालयांची नावे जाहीर केली होती. मात्र ही रुग्णालये अवाजवी डिपॉझिट आणि दर दिवशीचा बेड दर सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पालिकेने या रुग्णालयांचे डिपॉझिट, दरदिवशीचा बेड आणि आयसीयू दर जाहीर करावा, अशी मागणीही निमेश वसा यांनी केली आहे.