
पालघर जिल्ह्यातील तारापूर, चिंचणी ते धाकटी डहाणू परिसरातील सुमारे 25 गावांमधून मागील 90 वर्षांपासून दागिने घडविण्याचे साचे बनविण्याचा डाईमेकींग हा हस्तकलेशी निगडित उद्योग पारंपारिक पद्धतीने केला जातो,
हा उद्योग पन्नास ते साठ हजार लोकांच्या रोजंदारी आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे ,या उद्योगावर सुमारे ५० हजार लोकांचा उदरनिर्वाह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या अवलंबून आहे, सुमारे तीस किलोमीटर परिघात एकच प्रकारचा व्यवसाय घराघरांतून केला जातो असे भारतातील हे एकमेव ठिकाण असावे.
परंतु हा उद्योग एक असंघटित क्षेत्र असल्यामुळे आजतागायत सरकारी योजना किंवा सरकारी धोरणांच्या पातळीवर ह्या उद्योगाची विशेष दाखल घेतली नाही म्हणून या उद्योगाशी संबंधित कामगारांना न्यूनतम वेतन, भविष्य निर्वाह निधी,आरोग्य विमा,कर्ज इत्यादी आवश्यक गोष्टींचा लाभ मिळत नाही.
मागील काही काळापासून व्यवसायात आलेली मंदी आणि कोरोना प्रतिबंध करण्यासाठी मागील वर्षापासून लागू असलेले लॉक डाऊन इत्यादींमुळे डाईमेकींग व त्याच्याशी संलग्न व्यवसाय हे देशभरातील बाजारपेठा बंद असल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे या उद्योगावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आवक पूर्णपणे बंद झाल्यामुळे दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, व्यवसाय आणि घरे वैगेरे बांधण्यासाठी घेतलेली कर्जांची परतफेड कशी करावयाची या चिंतेत येथील लघुउद्योजक वर्ग आहे.
कोरोना संकटकाळाचा अपवाद वगळता नेहमी देशांतर्गत व्यापारातून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करणारा हा उद्योग आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून प्रचंड परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता या उद्योगात राहिली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे हे अतिशय मोठे आव्हान आज सरकारसमोर आहे, परंतु शिक्षित अथवा अशिक्षित सर्वच लोकांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणून या डाईमेकिंग उद्योगाची ख्याती आहे. यामुळे या भागातील प्रत्येक पिढीत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारवरील दबाव निश्चितच काही प्रमाणात कमी होतो.
ही क्षमता अजून वृध्दिंगत होण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्रालय मार्फत क्लस्टर सारख्या योजनेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरचे अद्यावत तंत्रज्ञान व त्यावर चालणारी यंत्रे उपलब्ध झाल्यास हा उद्योग भरभराटीस येऊन त्यास नवसंजीवनी मिळेल.
तसेच सद्याचा संकटातून सावरण्यासाठी आपल्यापुढे आमच्या काही सुचनावजा मागण्या आहेत त्यांचा सहानुभती पूर्वक व जबाबदारीने विचार करून पुढील कार्यवाही व्हावी ह्या असे मत खासदार गावित यांनी व्यक्त केले.
१) कोरोना साथरोगामुळे प्रभावित झालेल्या उद्योगास आर्थिक सहाय्यता तात्काळ प्राप्त व्हावी.
२) शासनाच्या लघुउद्योग क्लस्टर योजनेचा जास्तीत जास्त युनिट्स उभारून उद्योजकांना त्वरित त्याचा लाभ मिळावा. यामुळे जास्तीच्या रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल.
३)नवनवीन तंत्रज्ञान हाताळणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तत्सम प्रशिक्षण देणारी (स्किल इंडिया) केंद्र उभारण्यात यावीत.
४)या उद्योगातून निर्मित उत्पादनाला बाजारपेठ मिळेल व या हस्तकलेची माहिती जगभरात होईल या उद्देशाने देश विदेशात कार्यशाळा, प्रदर्शने आयोजित करण्यात यावीत यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग विभागा मार्फत कार्यक्रम आखण्यात यावा.
५)डाईमेकींग उद्योग केंद्रस्थानी ठेऊन ही परंपरागत हस्तकला टिकवून तिचे संवर्धन होईल या दृष्टीने शासन स्तरावरील कलाविषयक धोरणांची आखणी करावी.
६) बँकांच्या,वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या उद्योजकांना मंदावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता कर्जफेडीसाठी सवलत आणि जास्तीचा कालावधी मिळेल अशी व्यवस्था व्हावी.
७) नवीन युनिट्स उभारण्यासाठी सरकारी बँकांनी कर्जपुरवठा करण्यास अनुकूलता दर्शवावी.
८)कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच सर्व डाईमेकर वर्गाचा अंतर्भाव असलेली “डाईमेकर उत्कर्ष सेवा संघ” नावाची एक मध्यवर्ती नोंदणीकृत संस्था येथील कारागीर लोकांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन व सरकारी यंत्रणांचे सहकार्य प्राप्त व्हावे .
९) नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती दरम्यान ज्याप्रमाणे शेतकरी व इतर कामगार,मजूर इत्यादींना काही योजनांतर्गत शासनातर्फे सहाय्यता पॅकेज देऊन दिलासा दिला जातो त्याचप्रमाणे डाईमेकींग कामगारांचा तत्सम योजनांत लाभार्थी म्हणून अंतर्भाव करावा.
१०) उद्योगास आवश्यक यंत्रसामग्री सुरळीत चालण्यासाठी वीजपुरवठा नियमित व योग्य दाबाने होण्यासाठी प्रयत्न व्हावा.
ह्या संदर्भात केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री ह्यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी समवेत बैठक आयोजन करण्यासाठी मागणी केली.