
— नालासोपारामध्ये गावडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : शहरात शेकडो चाळी झाल्यात,तिथलं राहणीमान खूप खालावलं आहे. गटारची लाईन नाही, जायला रस्ते नाहीत, लाईट नाही. सत्ता येवो, नाही येवो. आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून या अनधिकृत बांधकामांसाठी क्लस्टर योजना आणि एसआरएच्या योजनेच्या माध्यमातून यांना त्यांच्या अधिकाराचं हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्न करणार, हा प्रहारचा शब्द आहे, अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांनी नालासोपारा येथे आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना दिली. यावेळी गावडे यांनी आपल्या भाषणात स्थानिक सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्लाबोल केला.
नालासोपारा पूर्वेकडील अंबावाडी येथील डिवाइन हायस्कूलच्या पटांगणात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा) भाजप, काँग्रेस, मनसे, आगरी सेना, ऑल इंडिया पँथर सेना या सर्व पक्षातील कार्यकर्ते या निर्धार मेळाव्यामध्ये धनंजय गावडे यांना समर्थन व साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे चित्र पाहून विरोधकांना ही निवडणूक कठीण जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेकडो चाळी झाल्यात,तिथलं राहणीमान खूप खालावल आहे. गटारची लाईन नाही, जायला रस्ते नाहीत, लाईट नाही. सत्ता येवो, नाही येवो. आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून या अनधिकृत बांधकामांसाठी क्लस्टर योजना आणि एसआरएच्या योजनेच्या माध्यमातून यांना त्यांच्या अधिकाराचा हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्न करणार, हा प्रहारचा शब्द आहे
ठाकूरांच्या राज्यात जन्म तर सुकर नाहीच, मरणही सुकर नाही. तरीसुद्धा मला कळत नाही की किती निर्लजपणे ठाकूर म्हणतात की आम्ही वसईचा विकास केलाय, असा प्रहार गावडे यांनी यावेळी पुढे बोलताना केला. वसई विरार महानगरपालिकेत राक्षसी बहुमत दिलं. 120 नगरसेवकांपैकी 114 नगरसेवक तुम्ही दिले,या वसईने दिले. काय मिळाले त्याच्या बदल्यात?. साध्या मूलभूत सुविधाही नाहीत. तरीसुद्धा आम्ही विकास केला आहे, असं सत्ताधारी सांगत आहेत, असा टोलाही गावडे यांनी लगावला.
विरारमधील चारशे रुम असलेल्या सहकार नगरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी पाच शौचालये आहेत. विकासाच्या बाता मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे. आम्ही याठिकाणी अवघ्या पंधरा दिवसात ४० शौचालये मंजूर करून आणली. जी कामं सहज होण्यासारखी आहेत, ती जर होत नसतील तर विकासाच्या गप्पा मारणाऱे सत्ताधारी काय लायकीचे आहेत, याचा विचार आपण कधी करणार?. म्हणूनच सत्ताधाऱ्यांकडून ३५ वर्षांचा हिशोब मागायला हवा, असेही गावडे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुक जाहिरनाम्यामध्ये १७ उड्डाणपूल करणार असल्याचे वचन दिले होते. पण, अद्याप एकही उड्डाणपूल झालेला नाही. विरारमधील एक उड्डाणपूल बांधायला १० वर्ष लागली. तर दुसरा उड्डाणपूल ७ वर्षे झाली असून अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाही. याउड्डाणपूलाच्या बांधकामाची गिनीज बुकात नोंद व्हायला हवी, असा उपरोधिक टोला लगावत गावडे यांनी वसई विरार शहरातील गंभीर वाहतूक समस्येकडेही लक्ष वेधले.
वसई विरार महापालिकेचे एकही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. बाप-बेटांनी मिळून वसई विरार शहरात गेल्या ३५ वर्षांत पाचशे हॉस्पीटलची उद्घाटने केली. कारण यांचा हा पिंड नाही. हे धंदेवाले आहेत, हे व्यापारी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. या व्यापाऱ्यांना घरी बसवायची वेळ आलेली आहे, असेही गावडे यांनी सांगितले.
मागच्या निवडणुकीत आमदार क्षितीज ठाकूर यांनी 100 एकर मध्ये शाळा बनवणार असल्याचे सांगितले होते. ही शाळा दूरच, शहरातील जिल्हा परिषदेच्या असलेल्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. तिथे शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना बसायला जागा नाही. पण त्यांच्यासाठी कोण करणार नसेल तर तुम्हाला आम्हाला त्याचा विचार करायला हवा, असे गावडे यांनी सांगितले.
गेली 35 वर्षे झाले विकास केला म्हणून सांगत असलेल्या सत्ताधाऱ्यांना आता जाब विचारायला पाहिजे. वसई विरारमधील भ्रष्ट सत्ता उखडून टाकण्यासाठी आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या साथीची गरज आहे आणि हाच या निर्धार मेळाव्याचा उद्देश आहे, असे गावडे यांनी स्पष्ट केले. यशस्वी निर्धार मेळाव्यामधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून धनंजय गावडे यांनी ही निवडणूक या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि ताकदीने आम्ही निवडणुक नक्कीच जिंकू, असा विश्वास गावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख हितेश जाधव, शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते मिलिंद खानोलकर, स्वराज अभियान कार्याध्यक्ष प्रिंस सिंह, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, शिवसेना उबाठा जिल्हा सचिव अनिल चव्हाण, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मनोज खाडे यांनीही मेळाव्यात बोलताना सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टिका केली. स्वराज अभियान उपाध्यक्ष डॉ. प्रकाश वायदंडे, सरचिटणीस सुशील द्विवेदी, स्वराज अभियान वसई ग्रामीण तालुकाप्रमुख राजू पाटील,शिवसेना शहरप्रमुख गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते डिंकू सिंह, योगेश वैद्य, स्वराज्य अभियानाचे आचोळे शहप्रमुख नितीन कदम, तुळींज शहरप्रमुख श्रीधर मर्चंडे, नालासोपारा पश्चिम पांचाळनगर शहरप्रमुख रमेश कोळी, श्रीप्रस्थ शहरप्रमुख संदीप सावंत यावेळी यावेळी उपस्थित होते.

