
:खानिवडे : वसई तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रसिद्ध खानिवडे श्रीराम मंदिर चोरट्यांनी पुन्हा फोडले असून मंदिरातील दान पेटी फोडून दानधर्म केलेली रोकड लंपास केली . यावेळी चोरटा सी सी मध्ये चोरी करत असताना चे दृश्य कैद झाले असून त्याने डोक्यासह चेहरा केशरी कपड्याने गुंडाळल्याचे दिसत आहे . या मंदिरात आजवर अनेकदा चोरी झाली असून २०१९ साली पुनरजिर्णोध्दार करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात तीन वर्षांच्या कालावधीत तिसऱ्यांदा अज्ञात चोरांनी मंदिर फोडले . मात्र चोरी करणारे अज्ञात चोर अध्यापही पोलिसांच्या हाताबाहेर आहेत . गणेशोत्सवाची तयारी ऐन भरात आलेली असताना , त्या उत्सवासाठी लागणारी सजावट मंदिरात सुरू होती .त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गावकरी मंदिरात सजावटीचे काम करत होते . ते सर्व आपापल्या घरी गेल्यानंतर पहाटे 3 ते साडेतीन वाजेच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य दरवाजाची कुलूपकडी फोडून त्यानंतर एकटा घुसलेल्या चोराने दानपेटी फोडल्याचे सीसी मुळे दिसून येत आहे . महामार्गाला लागून गावाच्या अगदी सुरवातीला हे मंदिर असल्याने व मंदिराच्यापुढे गाव सुरु होत असल्याने येथे रात्री शुकशुकाट असतो .याचा फायदा चोरटे घेत असून मंदिरात चोरीच्या घटना अधून मधून घडतच असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे .यासाठी पोलिसांनी चोरांचा माग काढून त्यांना लागलीच जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे .दरम्यान याबाबत गावकऱ्यांनी मांडवी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे .