
नालासोपारा :- टेंडर निघाले असल्याचे कारण देऊन गेली अनेक वर्ष गटारे बांधण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेवर चाणक्य नगरी फेडरेशनने चिखलफेक करण्याचा निर्धार केला आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात असलेल्या चाणक्य नगरीत 20 इमारती असून येथील हजारो नागरिक रस्ते आणि गटारां पासून गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित आहेत. त्यामुळे या नगरीतील मुख्य रस्ते, सोसायटीचा आवार पाण्याखाली बुडून जातो. परिणामी सलग सात आठ दिवस नागरिक घरात कोंडले जातात. तळमजल्यावरील शेकडो घरांमध्ये आणि सोसायट्यांच्या आवारात तसेच रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून राहते, या पाण्यातून मलमूत्र उंदीर, झुरळ घरात शिरत असल्यामुळे पावसाळ्यात या परिसरात साथीचा आजार पसरतो. सांडपाणी आठवडाभर घरात ठाण मांडून राहिल्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, अन्नधान्य यांची नासाडी होते. महावितरणाच्या बॉक्समध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक सोसायट्यांचा वीज पुरवठा चार ते पाच दिवस खंडित केला जातो. त्यामुळे या दिवसात शेकडो नागरिक तळमजल्याचे घर सोडून सोसायटीच्या टेरेसवर आसरा घेतात. दर पावसाळ्यात शेकडो रहिवासी अन्न,पाणी आणि विजेपासून वंचित राहतात.
त्यामुळे लवकरात लवकर पावसाळी पाण्याचा निचरा करणारी गटारे बांधण्यात यावी अशी मागणी दर साल येथील फेडरेशन कडून महापालिकेकडे केली जाते.त्यावर टेंडर निघाले आहे काम सुरू होईल असे आश्वासन गेल्या कित्येक वर्षांपासून दिले जात आहे. यावर्षीही हेच कारण महापालिकेने पुढे केले आहे. पाऊस तोंडावर आला असतानाही अजून पर्यंत गटाराच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे यंदाही चाणक्य नगरी पाण्याखाली बुडणार आहे. त्यामुळे महापालिकेवर चिखलफेक आंदोलन करण्याचा निर्धार फेडरेशनने केला आहे.