कै.अनंतदादा वालंज यांच्या आकस्मित निधनाने उन्हवरे विभागासह दापोली तालुक्यात हळहळ …
गावाच्या पारापासून, विभागापर्यंत, तालुका, जिल्ह्यापासून, मुंबई पर्यंत सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रभावीपणे कार्य बजावणारे व नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणारे उन्हवरे विभागातील करंजाळी गावचे सुपूत्र,लोकप्रिय सेवाभावी व्यक्तिमत्त्व कै.अनंतदादा वालंज यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले असून सामाजिक तथा राजकीय चळवळीतील लढाऊ प्रेरणादायी नेतृत्व हरपल्याची सर्व स्तरातून तीव्र शोकभावना व्यक्त होत आहे. समाजाचा बहुमुखी विकास, समाज संघटन,सामाजिक बांधिलकी,समाज प्रबोधन, समाज जनजागृती, अतुट समाजप्रेम,ग्रामीण भागातील भेडसावणाऱ्या समस्यांचा सातत्याने पाठलाग करणारे थोडक्यात ग्रामीण विकासाची वेड असणारे मध्यमवर्गीय गरीब शेतकरी कुटुंबाच्या संघर्षातून उभारलेले उन्हवरे विभागातील ज्वलंत मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अनंतदादा वालंज होय. दादा नेहमी बोलायचे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगा,कारण व्यक्ति कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जीवंत राहते. दादांचे व्यक्तिमत्त्व आज त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेने कायम जीवंत राहिले आहे. स्वतः ची तब्येत खालावलेली असताना देखील सातत्याने लोकसहभाग लोकचळवळीच्या माध्यमातून समाजहीत जोपासणारे,कधीही संतुलन न ढासळता,समाजासाठी सातत्याने संघर्ष करणारे ,सतत युवकांमध्ये जोष वाढवणारे ते एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना तीव्र धक्का बसला असून, कुणबी समाजाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभाग संलग्न कुणबी युवा संस्थेच्या जडणघडणीत दादांची भूमिका अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच होती. सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात अनेकांना सकारात्मक मार्गदर्शन करणारे ,नेहमी शिष्टाचाराने लहान थोरांशी वागणारे, १८ गावातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व,सामाजिक क्षेत्रात स्वःकर्तुत्वाने आपले अस्तित्व निर्माण करणारे तमाम युवकांचे आदर्शस्थान, प्रेरणादायी बहुआयामी व्यक्तिमत्त्व समाजसेवक आदरणीय कै.अनंतदादा वालंज आज तुमच्या आमच्यात नाहीत या घटनेवर अजूनही कोणाचा विश्वासच बसत नाही.. सामाजिक चळवळीतील एक लढाऊ, निडर समाजसेवक १८ गाव कुणबी समाज व दापोली तालुक्याने आज गमावलेला आहे,अशा प्रतिक्रिया त्यांच्या प्रती समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यांची पोकळी नेहमी सर्वानाच प्रकर्षाने कायम जाणवत राहिल. ते ओम बेलेश्वर मध्यविभाग सहकारी मंडळाचे मार्गदर्शक,करंजाळी गावाचे कार्यकर्ते तसेच कुणबी समाज विकास संघ १८ गाव उन्हवरे विभाग मुंबईचे खजिनदार व शिवसेना उन्हवरे विभागप्रमुख म्हणून सध्या कार्यरत होते. त्यांच्या पाश्चात्य त्यांची आई,पत्नी, दोन मुले ,विवाहित भाऊ,दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते ५० वर्षाचे होते. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व १८ गाव कुणबी समाज उन्हवरे विभागात तसेच दापोली तालुक्यात पुन्हा होणे नाही… दादा तुमच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली .. जय महाराष्ट्र .. जय कुणबी !