
नालासोपारा (प्रतिनिधी) :- एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे काम तपासी पोलीस अधिकाऱ्याचे असते. वसईच्या नऊ पोलीस ठाण्याअंतर्गत वसई न्यायालयात 1 जानेवारी ते 31 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रथम दंडाधिकारी येथे 938 केसेस तर जिल्हासत्र न्यायालयात 28 केसेस चालल्या आहेत. त्यापैकी प्रथम दंडाधिकारी यांच्याकडे 469 केसेस निकाली निघाल्या असून 121 शाबीत तर 287 केस सुटल्या व 61 केस तडजोड झाल्या आहे. तर जिल्हासत्र न्यायालय यांच्याकडे 14 केसेस निकाली निघाल्या असून 4 शाबीत तर 10 केस सुटल्या आहे. 2021 मध्ये वसईतील पोलिसांची कामगिरी सरस होत असली तरी गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होणे गरजेचे आहे. गुन्ह्याचा सखोल तपास केला नसल्यानेच आरोपीला गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यास संधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना स्वतंत्र पथकांकडून अटक केली जाते. प्रत्यक्ष तपास मात्र पोलीस ठाण्यातील यंत्रणेकडून करून घेतला जातो. ही यंत्रणा न्यायालयात दोषारोपपत्र सादर करते. यामुळे गुन्ह्याचे ‘मेमोरॅन्डम’ आणि प्रत्यक्ष घटना यात बरीच तफावत असते. गुन्हे शाखेकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जाते. बरचेदा गुन्हा कबूल करण्यासाठी आरोपीला कस्टडीत ठेवून ट्रिटमेंट दिली जाते. नंतर हा गुन्हेगार पोलीस ठाण्यातील यंत्रणेकडे दोषारोपपत्र तयार करण्यासाठी सुपूर्द केला जातो. तेव्हा त्याने पथकापुढे दिलेली कबुली रेकॉर्डवर आणताना तपास अधिकाऱ्याची दमछाक होते. अनेकदा प्रकरण न्यायालयात साक्षी पुराव्याला लागल्यानंतर साक्षीदारच फितूर होतो. खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांकडून ‘क्रॉस’ घेतली जाते, तेव्हा दोषारोपत्रातील घटनाक्रम आणि अटकेची कारवाई यात तफावत दिसून येते. याच कमजोर कड्या पकडून दोषारोपपत्राची चिरफाड केली जाते. परिणामी याचा फायदा गुन्हेगाराला मिळतो. साधारणत: न्यायालयात चालणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेची कारवाई पोलीस ठाणे स्तरावरच होते. अटकेची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याकडे गुन्ह्याचा तपास दिला जातो. त्यामुळे दोषारोपपत्रात विशेष उणीवा राहत नाही. गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून प्रत्येक क्राईम मिटींगमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या जातात.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात झोन 1, झोन 2 आणि झोन 3 अशी तीन परिमंडळे येतात. वसई तालुक्यात झोन 2 व झोन 3 परिमंडळ येत असून त्या अंतर्गत सुमारे 9 पोलीस ठाणे आहेत. याशिवाय गुन्हे अन्वेषण शाखा, खंडणीविरोधी पथक, अमलीविरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा, महिला तक्रार निवारण कक्ष आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग, अशा स्वतंत्र शाखा कार्यरत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडय़ाचा प्रयत्न, हाणामारी, घरफोडी, वाहन चोरी, अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्य़ांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दररोज होत असते. तसेच सोनसाखळी चोरी, तोतयागिरी, फसवणूक अशा गुन्ह्य़ांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे. यापैकी कोणत्या गुन्ह्य़ांचा तपास कोणी करावा याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांपासून हवालदारापर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार, गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहून तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक ते हवालदार यांच्याकडे देण्यात येतात. एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास सोपविल्यानंतर त्याचा स्वतंत्रपणे तपास करण्याची जबाबदारी त्यांची असते.
याबाबत बोलताना झोन तीनचे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे म्हणाले, गुन्हा शोधून काढणे, त्यादृष्टीने पुरावे सकंलित करणे आणि कोर्टात आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पुराव्यांची मांडणी करणे ही मोठी प्रक्रिया असून, तसे प्रशिक्षण वेळोवेळी पोलिस अधिकाऱ्यांना वा कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते. पैरवी अधिकारी तसेच कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असून, फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक व्हॅन यांचा प्रत्येक घटनेत खुबीने वापर केला जातो आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांसोबत सतत संवाद सुरू असतो. त्याचा हा परिणाम आहे.
पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात होतेय वाढ………
वसई तालुक्यात पोक्सोअंतर्गंत गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही दिवसांपासून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील दोन ते तीन महिन्यातच सात पोलीस ठाण्यात पाच ते सहा घटना घडल्या आहेत.
1) प्रथम दंडाधिकारी केसेसची आकडेवारी……….
क्र. ठाणे एकूण निकाली शाबीत सुटल्या तडजोड
1) वसई – 36 – 18 – 11 – 7
2) माणिकपूर – 43 – 16 – 23 – 4
3) तुळींज – 54 – 13 – 38 – 3
4) वालीव – 176 – 30 – 114 – 32
5) आचोळा – 0 – 0 – 0 – 0
6) विरार – 99 – 29 – 60 – 10
7) पेल्हार – 2 – 2 – 0 – 0
8) नालासोपारा – 48 – 13 – 30 – 5
9) अर्नाळा – 11 – 0 – 11 – 0
2) जिल्हा सत्र न्यालयातील केसेसची आकडेवारी………..
क्र. ठाणे एकूण निकाली शाबीत सुटल्या तडजोड
1) वसई – 1 – 0 – 1 – 0
2) माणिकपूर – 3 – 1 – 2 – 0
3) तुळींज – 1 – 1 – 0 – 0
4) वालीव – 4 – 1 – 3 – 0
5) आचोळा – 0 – 0 – 0 – 0
6) विरार – 3 – 1 – 2 – 0
7) पेल्हार – 0 – 0 – 0 – 0
8) नालासोपारा – 1 – 0 – 1 – 0
9) अर्नाळा – 1 – 0 – 1 – 0
1) खटले सुरू झाल्यानंतर साक्षीदार, पंच नाम्यामधील पंच फितूर होतात. तर काही घटनांमध्ये दोन्ही पक्षात समेट होऊन फिर्यादी सुद्धा फितूर होतात. न्यायालयात पोलिसांनी सादर केलेले भौतिक पुरावे सिद्ध होत नाही. तपासातील काही त्रुटींमुळे आरोपीची सुटका होते. – संजयकुमार पाटील (पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन, पोलीस आयुक्तालय)