

विशेष प्रतिनिधी – कोरोनाच थैमान सुरू असताना वसई विरार येथे लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीने होत आहे , ४ महिन्यात केवळ एक लाख लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत.२५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात एक लाख लोकांना लसीचे डोस मिळाले हे अधिकृत आकडेवारी सांगते. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसताना देखील लस घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्र वर जाऊन लस घेणे शक्य नाही. लसीकरण केंद्र वर होणारी वशिलेबाजी, CoWin ॲप मधील त्रुटी यांमुळे नागरिकांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नालासोपारा येथील लसीकरण केंद्रवर २ जणाचे मृत्यू झाले तरीही प्रशासन यावर काहीच नियोजन करत नसल्याचे दिसून येत आहे.
आमची वसई सामाजिक संस्थेने वसई विरार शहरातील लसीकरण केंद्रावरील नागरिकांचे हाल लक्षात घेता वसई विरार महानगर पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना गृह संकुल, चाळ येथे लसीकरण मोहीम सुरू करा अशी मागणी केली. तब्बल ३५०+ सोसायटी, चाळ, पतसंस्था, खासगी / सरकारी आस्थापना यांनी आमची वसई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालिका व जिल्हा प्रशासनाकडे स्वतःच्या जागेत येऊन लसीकरण मोहीम सुरू करावी अशा मागणीचे निवेदन दिले. मुंबई महानगर पालिका यांनी गृह संकुल चाळ येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी ऑनलाईन संवाद दरम्यान अशा प्रकारे गृह संकुल चाळ येथे लसीकरण करण्यासाठी मागणी करत ती मागणी मंजूर झाली आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरि यांनी कारखानदार यांना स्वतःच्या जागेत लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय म्हणते परदेशात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे, भारतात नेमके उलट चित्र आहे. व्हील चेअर वरून लस घेणारे , लस घेण्यासाठी तेथे गर्दी करणारे जेष्ठ नागरिक हे चित्र योग्य नाही. आपल्याकडे सर्व गोष्टी उशिराच केल्या जातात. गृह संकुल चाळ येथे लसीकरण वेळेत सुरू नाही झाले तर अनेकांना रांगेत जीव किंवा याच रांगा कोरोना प्रादुर्भाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी साथरोग प्रतिबंध कायद्या अंतर्गत खासगी रुग्णालय, डॉक्टर नर्स संघटना यांची मदत घेत छोटे-छोटे चमू बनवून गृह संकुल चाळ येथे लसीकरण सुरू करावीत जेणेकरुन जलदगतीने लसीकरण होण्यास मदत होईल. लसीकरण केंद्र वाढवून त्यात नियोजन शून्य कारभार होत असेल तर लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जनतेची रास्त मागणी होत आहे की गृह संकुल चाळ येथे लसीकरण मोहीम सुरू करावी. छोट्या मोठ्या प्रमाणावर नियोजनपूर्वक लसीकरणावर भर द्यावा. प्रशासनाने जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये.