
बोईसर,प्रतिनिधी,दि.2 ऑक्टोंबर
पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेण्यासाठी विरोधकांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर होत आहे.या पक्षपाती दबावतंत्रामुळे मतदारांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे.
एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेसोबत गद्दारी करून सरकार बनविताच राज्यात शिवसैनिकांची फोडाफोडी सुरू केली आहे.मात्र सुरवातीला पालघर जिल्ह्यात फक्त हातावर मोजण्याइतकेच पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना फुटत नाही हे बघून पायाखालची जमीन सरकलेल्या शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकणार्या प्रमुख नेत्यांवर पालघर जिल्ह्यातील शासकीय अधिकार्यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करीत जबरदस्तीने पक्ष सोडण्यास भाग पाडत असून शिंदे गटात सामील होण्यास बाध्य करीत आहेत.
पालघर जिल्ह्यात 16 ऑक्टोबर ला 343 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे.यामध्ये विरोधी गटातील इच्छुक उमेदवारांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याचे कारण देत महसूल विभागाकडून कारवाईसाठी नोटीसा बजावण्याचा सपाटा लावला आहे.मात्र या कारवाईत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना वगळण्यात आल्याने सरकारच्या या पक्षपाती कारवाईविरोधात मतदारांकडून संताप व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यात बोईसर,मनोर,सफाळे,केळवे आणि उमरोळी अशा प्रमुख ग्रामपंचायतीसह एकूण 83 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र आले असून महाविकास आघाडी मधील शिवसेना,राष्ट्रवादी कोंग्रेस,कोंग्रेस आणि बहुजन विकास आघाडी कडून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे.बोईसरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बांधकामांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईसाठी घाईगडबडीत पालघरच्या तहसीलदारांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.यामध्ये विरोधी पक्षातील बोईसरच्या माजी उपसरपंचासहीत आणखी चार-पाच उमेदवारांचा समावेश असून त्यांना जबरदस्तीने निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले जात आहे.असे असताना मात्र सत्ताधारी पक्षातील सरपंच पदाच्या शर्यतीत असणार्या आणि सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणार्या एका भूमाफीया आणि चाळ माफीयाला मात्र या कारवाईतून वगळल्याने भाजप आणि शिंदे गटातील उमेदवारांना महसूल विभाग झुकते माप देऊन पक्षपात करीत असल्याचा आरोप होत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत सुरू असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पक्षपाती दबावतंत्रामुळे कट्टर शिवसैनिकांसह विरोधी पक्षात देखील चीड निर्माण झाली असून सरकारच्या साम-दाम-दंड भेद नीतीला झुगारून निवडणुकीला खंबीरपणे सामोरे जाण्याचा निश्चय केला आहे.
कोट-१
संपूर्ण पालघर जिल्ह्यात शिंदे-फडणवीस सरकारडून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातील उमेदवारांवर दबाव टाकून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जात आहे.हा सर्व प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा असून या बाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
–सुनील भुसारा
आमदार,विक्रमगड विधानसभा
कोट-२
बोईसर परिसरातील शासकीय जागेवरती अतिक्रमणाबाबत जेवढे अहवाल मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पालघर तहसील कार्यालयात प्राप्त झाले आहेत त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावण्यात आली असून यापुढे नव्याने अहवाल प्राप्त झाल्यास नोटीस बनवण्यात येथील.
सुनील शिंदे
तहसीलदार पालघर