

नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतुन वसई पश्चिम कृष्णाटाऊनशिप मार्गे वसई पूर्व तिथुन नायगाव खाडीला मिळते ही महत्वपूर्ण सोपारा खाडी माती भराव करून तिथे मैदान तयार केले आणि खाडीचा मार्ग महानगरपालिकेने पर्यावरण विभाग यांची परवानगी न घेता बदलला . गेल्या जुलै२०१८ च्या पूरपरिस्थितीला हा बदललेला मार्गदेखील जबाबदार आहे असे शिवसेना नवघर माणिकपूर शहर शाखेने तत्कालीन आयुक्त श्री सतीश लोखंडेजी आणि आताचे आयुक्त श्री बी जी पवार यांना वारंवार भेट घेऊन व पत्र व्यवहार करून सांगण्यात आले.
सत्यशोधन समिती मधील निरी आणि आय आय टी यांनी देखील जो महानगरपालिकेने १२ कोटी खर्च करून जो प्राथमिक अहवाल दिला आहे त्यात या २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी करण्याची आवश्यक कामे यामध्ये पान क्रमांक २१ व २२मध्ये हा बदलेला मार्ग पूरपरिस्थितीला आमंत्रण देणारा असून त्यामुळे पूरपरिस्थिती उदभवते असे सांगून या पावसाळ्यापूर्वी त्यावर काम करून पाण्याचा निचरा होण्यास पूरक करावा असे नमूद केले आहे, परंतु निगरगट्ट महानगरपालिका अधिकारी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून वसईकर जनतेची दिशाभूल करण्यासाठी आयुक्त यांनी हे मैदान कोणाचे यासाठी चौकशी समितीच फार्स केला आहे. महानगरपालिका जर सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार काम करणार नसेल तर जनतेचे १२ कोटी का खर्च केला असा सवाल शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी विचारला आहे.
महानगरपालिकेला आम्ही वारंवार या गोष्टी सांगून देखील वसईकर जनतेला मानवनिर्मित पुरात ढकलणार असाल तर या सोंग घेतलेल्या आयुक्त आणि अधिकारी यांना जागे करण्यासाठी आणि ज्या अधिकाऱ्यांनी खाडीत भरीव टाकून मैदान तयार केले व खाडीचा मार्ग बदलाला त्यांना निलंबित करण्यात यावे यासाठी सोमवार दिनांक २४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता वसई विरार शहर महानगरपालिका कार्यालय एच प्रभाग , नवघर डेपोजवळ, वसई रोड पश्चिम येथे ‘घंटा वाजवा’ आंदोलन शहर शाखा शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख श्री राजाराम बाबर, उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सांगितले आहे.