
नालासोपारा :- दारू पिऊन वाहन चालवल्याने स्वतःसह दुसऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण केला जातो. यामुळे होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी आयुक्तालयातील पोलिसांनी वेळोवेळी मोहीम राबवली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री देखील झिंगाट होऊन वाहन चालवणाऱ्या १७० वाहन चालकांवर वाहतूक विभागाने ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस करून कारवाई केली आहे. तसेच इतर वेळीही रात्रीच्या वेळी दारू पिऊन वाहन चालणे टाळावे यासाठी प्रबोधन केले जात आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी आयुक्तालयात अनेक वेळी मोहीम आखून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. याशिवाय देखील अशा कारवाई करण्यास पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे झिंगाट होऊन वाहन चालविणाऱ्यांवर वचक बसली आहे. आपली आणि दुसऱ्या जीवाची काळजी करून दारू पिऊन वाहन चालवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १७० जणांवर कारवाई
पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर काशिमिरा येथे ५६ केसेस, वसईत ७१ केसेस आणि विरारमध्ये ४३ केसेस असे एकूण १७० ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या आहेत.
पार्टीवरून मित्रांमध्ये फ्रीस्टाईल
अनेकवेळा हॉटेल, बारमध्ये पार्टी करण्यास बसलेल्या मित्रांमध्ये झिंगाट झाल्यावर फ्रीस्टाईल देखील झाल्या आहेत. त्यातून हॉटेल बारची तोडफोडी झालेली आहे. अशा टार्गेट युवकांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
प्रसंगी हॉटेल चालकांवरही कारवाई
नियम, वेळमर्यादा यांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर देखील पोलिसांनी आयुक्तालयात वेळोवेळी कारवाई केली आहे. त्यामुळे रात्रीच्या दिलेल्या वेळेतच हॉटेल चालवून योग्य ते पालन करणे गरजेचे आहे.
रस्त्यावर पार्टी करणारे कोठडीत
रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर पार्टी कराल तर पोलीस कोठडीची हवा खावी लागेल असे आव्हान पोलिसांनी केले आहे. त्यामुळे चौक, रस्ते, ओपन प्लेसमध्ये पार्टी कराल तर सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन हजार पोलिस होते तैनात
मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपआयुक्त, सर्व सहा पोलीस आयुक्त यांचे देखरेखेखाली एकुण २५० पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, २५० होमगार्ड व ३०० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान ३१ डिसेंबरच्या रात्रभर कडक बंदोबस्तामध्ये तैनात होते.
दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा
थोड्याशा मजेसाठी आपला आणि समोरच्या व्यक्तीचा जीव धोक्यात घालू नका. दारू पिऊन वाहन चालवणे गुन्हा आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे यंदा अपघात कमी झाले आहेत. नववर्षाचा जल्लोष साजरा करा, परंतु मर्यादेत राहूनच करा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. – पोलीस प्रशासन