

वसई : (प्रतिनिधी) : यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर पुन्हा चार दिवस गुडूप झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पुण्याच्या वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानंतर आज महाराष्ट्रासहित कोकण पट्ट्यात मान्सून पुन्हा दाखल झाला आहे. पालघर, वसई आणि मुंबई या पट्ट्यात आज आणि उद्यापासून मान्सून सक्रिय होणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तवले असून शेतकर्यांनी भातपेरण्यांचा वेग वाढवला आहे. अद्याप पावसाने पाय घट्ट रोवले नसल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचे चित्र कायम असल्याचे दिसून येते. टँकरलॉबीला भलतेच उधाण आले असून नुकत्याच झालेल्या कारवाईनंतरही टँकरलॉबीकडून दुषित पाण्याचा पुरवठा सुरूच असल्याचे दिसून येते.
वसई तालुक्याचा ग्रामीण भाग हा शेतीप्रधान परिसर म्हणून ओळखला जातो. भाताच्या विविध जातींची लागवड करून त्यातून यशस्वी उत्पन्न घेणार्या शेतकर्यांना मागील दोन ते तीन वर्षांपासून लहरी पर्जन्याचा फटका सोसावा लागतो आहे. मागील वर्षी दुष्काळाची छाया असल्याने उन्हाळी शेतीतून शेतकर्यांची झोळी भरली नाही. यंदा पावसाळ्यात तरी भातशेतीतून सर्व कसर भरून निघावी अशी किमान अपेक्षा शेतकर्यांना आहे. यंदा तालुक्यात पावसाने खूप उशिरा एन्ट्री घेतल्याने भातलागवडीला विलंब होणार हे मात्र निश्चित. गौरी गणपती सणापर्यंत भात लावणीचा हंगाम चालू राहणार असल्याने यंदा गौरी गणपतीचा सण साजरा करण्याऐवजी शेतकर्यांना शेतात राबावे लागणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर वसई तालुक्यात पावसाने पाय रोवले असून पुढील तीन दिवसांत तो जिल्ह्यात सक्रिय होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.