वसई : वसई-पाचू बंदर येथील मासळी मार्केटमध्ये शुक्रवारी भवलेल्या भाजी मार्केटमध्ये महिलांची झुंबड़ उडून चेंगराचेंगरी झाली होती; मात्र यातून पालिका अथवा वसई सहकारी मच्छीमार सोसायटीने शहाणपण घेतलेले दिसत नाही. शनिवारी इस्टरचे निमित्त करत या ठिकाणी चिकनची दुकाने लावण्यास मुभा दिली गेल्याने कालचेच चित्र आज या ठिकाणी दिसत होते.

वसई-पाचू बंदर येथे वसई सहकारी मच्छीमार सोसायटीकडून सोसायटी आवारात मासळी लीलाव केला जातो. सध्या कोरोनाचे संकट असल्याने हा व्यवसाय मंदावला आहे. तालुक्यात संचार बंदीही लागू करण्यात आली असून; नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे; मात्र जीवनावश्यक वस्तूच्या नावे काही ठिकाणी हे आदेश धुडकावले जात आहेत.

वसई-पाचूबंदर भागही याला अपवाद राहिलेला नाही. या ठिकाणी कित्येक वेळा ‘सोशल डिस्टनसिंग’चे नियम मोडीत काढले गेले आहेत. शुक्रवारी तर या ठिकाणी भरवलेल्या भाजी मार्केटमध्ये महिलांची खरेदीसाठी झुंबड़ उडाली. त्यांनतर झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला एकमेकींच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली होती.

त्यानंतरही येथील लोकांनी शहाणपण घेतलेले दिसत नाहीये. शनिवारी पुन्हा एकदा इस्टरचे निमित्त पुढे करत या ठिकाणी चिकनची दुकाने लावण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी कालसारखी परिस्थिती उद्भवली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *