

चिपळूण (प्रतिनिधी): केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकतेच प्राप्त झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांचा सत्कार चिपळूण नगर परिषदेतील ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी नगरसेवकांनी नुकताच केला. चिपळूणवासीयांकडून होत असलेल्या सत्काराने आपण भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया श्री. ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपूर्वी चिपळुणात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून दाखल झालेले नवनाथ ढवळे यांनी कोरोनाच्या लढाईत अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उत्तमपणे कामगिरी बजावत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक गुन्हे उघडकीस आणून आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. एकंदरीत उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांची पोलिस दलातील कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय गृह विभागाकडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले. याबद्दल चिपळूण काँग्रेसच्या नगरसेवकांनी नुकताच या अधिकाऱ्याचा सन्मान केला आहे. यावेळी नगरसेवक कबीर काद्री, करामत मिठागरी, नगरसेविका सौ. सफा गोठे आदी उपस्थित होते.