नालासोपारा :- आपल्या पैकी अनेकांना असे वाटते कि आपल्याकडे देखील चारचाकी किंवा दुचाकी असावी. पण त्या गाडीचा नंबर आपल्या पसंतीचा असावा. त्यासाठी अनेकजण कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. पण आता चॉईस नंबरसाठी चढाओढ करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण यापुढे आवडीच्या नंबरसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबतची महत्वपूर्ण घोषणा राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात आली आहे. कुठल्याही वाहनाच्या आवडीच्या नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात भरघोस वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत असणार आहे. आवडीच्या नंबरसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे राज्य सरकारला यामधून कोटय़ावधी रुपयांचा महसूल मिळत असतो.

व्हीआयपी नंबरचे दर

नंबर जुना दर नवीन दर
०००१ – ३ लाख – ५ लाख

०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९ – दीड लाख – अडीच लाख

०१११, ०२२२, ०३३३, ११११, २२२२ – ७० हजार – १ लाख

किमान सहा हजार लागणार

००११, ००२२, ००८८, ०२००, ०२००, ०२०२, ४२४२, ५६५६, ७३७४ या सारख्या १८९ क्रमांकासाठी चारचाकी आणि मोठी वाहने १५ हजार तर दुचाकी, तीनचाकीला ६ हजार शुल्क आकारले जाणार आहे.

आता १५ हजार

मागणी असलेल्या इतर ४९ क्रमांकाच्या दुसर्‍या संचासाठी, दुचाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क १० हजार ऐवजी १५ हजार रुपये लागणार आहे.

नऊ वर्षांनंंतर वाढ

महाराष्ट्र परिवहन विभागाने नवीन वाहनांसाठी व्हीआयपी नंबरसाठी शुल्क तब्बल नऊ वर्षांनंतर वाढविण्यात आले आहे. वाढत्या शुल्कामूळे राज्य सरकारला कोट्यावधीचा महसूल मिळणार आहे.

सूचना हरकती घेणार

राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून या हरकती व विचार करून नव्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

…तर लिलाव पद्धतीने मिळणार नंबर

आपला आवडता नंबर मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात रीतसर फी भरून वाहनचालक हे क्रमांक घेऊ शकतात. दलालांमार्फत वाहनधारकांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी कार्यालयाच्यावतीने सर्व पसंती क्रमांक व त्यांच्या किंमती दर्शविणारे दर फलक जाहीर करण्यात आले आहेत. आता तर ही सुविधा ऑनलाइनदेखील उपलब्ध आहे.

कोट

चॉईस क्रमाकांच्या माहितीसाठी विरार कार्यालयाच्या आवारात दर फलक जाहीर बसवण्यात आला असून, आम्ही वेळोवळी नवीन सिरीजची तसेच क्रमांकाची माहिती देत असतो. चॉईस क्रमांकांना चांगली मागणी असून, त्यामुळे यंदा महसुलात वाढ झाली आहे. – प्रवीण बागडे (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, विरार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *