

9 आरोपींवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल जप्त
नालासोपारा :- अवैधरित्या रेतीचे उत्खनन शिरगावच्या रेती बंदरांवर सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून दोन ट्रक, दोन जेसीबी, एक पिकअप टेंपो, साडे सात ब्रास रेती असा एकूण 48 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेतीवर पोलिसांची कारवाई झाल्याने चोरीची रेती वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अवैधरित्या उखन्नन व रेतीची चोरटी वाहतूक होणार नाही याची सक्त ताकीद आयुक्त सदानंद दाते यांनी सर्व प्रभारी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. पण विरार परिसरात रेती नदीतून आणि खाडीतून काढून महामार्गावरून वाहतूक पहाटेच्या सुमारास चालू असल्याबाबत अनेक तक्रारी व गुप्त माहिती पोलीस आयुक्तांना मिळत असते. विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना शिरगावच्या रेती बंदरांवर रेल्वे ब्रिजच्या पूर्वेकडील भागात रेतीचे अवैधप्रमाणे उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी विरार पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी दोन जेसीबी, दोन ट्रक, एक पिकअप टेंपो आणि साडे सात ब्रास रेती असा एकूण 48 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याठिकाणी असलेल्या दीपक महादेव भोईर, नरेश गावड, ज्ञानेश्वर पाटील, जगदीश पाटील, ट्रक चालक सतीश बाबू राठोड (31), पिकअप चालक दिनेश मोतीराम वझे, ट्रक चालक गणपती होनू राठोड (32), दोन्ही जेसीबी चालक असे नऊ आरोपींविरुध्द भारतीय पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 चे कलम 15 व 19 सह भादविस कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.