

ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला व त्यातील इतिहास प्रसिद्ध वास्तूंची दुरावस्था हा रोजचाच चर्चेचा विषय आहे. जंजिरे वसई किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन १६ व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू अवशेष उत्तर कोकण, पालघर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अभ्यासकांना सदैव संशोधनासाठी खुणावत असतात. गेल्या चार पाच दिवसातील वाढत्या पावसाने किल्ल्यातील बहुतेक भागातील वास्तूंच्या भिंतीवर गच्च झाडी वाढलेली असून त्यातील काही वास्तू भुईसपाट होण्याच्या प्रवासाला लागल्या आहेत हे चित्र स्पष्ट आहे. किल्ल्यातील काही मोजक्याच वास्तू पुरातत्व विभागाच्या प्रत्यक्ष लेखी नोंदणीत येत असल्याने गर्द झाडीत विखुरलेले अबोल अवशेष कधी नोंदणी होतील व कधी संवर्धन होतील याबाबत मौन कायम आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी जंजिरे वसई किल्ल्यातील १६ व्या शतकातील ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला असून त्याची योग्य डागडुजी न झाल्यास सदर वास्तू मूळ स्वरूप हरवून बसेल यात शंका नाही. सद्या या वास्तूभोवती पुरातत्व विभागाचे लोखंडी जाळे बसवलेले असले तरी येणाऱ्या पर्यटक वर्ग व प्रेमीयुगले यांवर सदर कमानीचा मोठा भाग सहजपणे पडून पडून दुर्घटना होण्यासाठी शक्यता दाट आहे. सद्या नरवीर चिमाजी आप्पा स्मारकातून पुढे असणाऱ्या वळणावर या कमानीचा कोसळलेला भाग व विखुरलेल्या शिळा दिसत आहेत. पुरातत्व विभागाने सदर कमानींच्या संवर्धनासाठी गेल्या किमान ७० वर्षात विशेष डागडुजी न केल्याने या ख्रिस्तमंदिराचा अंतर्गत भागातील कमानींचा बराचसा भाग कोसळून गेला. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने अजूनही या पडलेल्या भागाची डागडुजी केलेली नाही. गेल्या ९ वर्षांपूर्वी जंजिरे वसई किल्ल्यातील मुख्य भुईदरवाज्याला समांतर असणारी भिंत व मातीचा ढीग कोसळला होता, त्या भागाची सद्या पुरातत्व विभागाने तब्बल दहा वर्षांनी त्याची डागडुजी सुरू केली. आज डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळलेला भाग पूर्णबांधणी करण्यात नेमकी किती वर्षे जातील ? याबाबत अंदाज देणे कठीण आहे. किल्ल्यातील बहुतेक वास्तूंची नियमितपणे होणारी पडझड हा अत्यंत चिंतेचा भाग असून याबाबत कमालीची पुरातत्वीय उदासीनता जंजिरे वसई किल्ल्यास मारक ठरत आहे. जंजिरे वसई किल्ल्याच्या संवर्धन सातत्याने प्रयत्नशील असणारे किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींनी पुरातत्व विभागाच्या महाराष्ट्रभर चाललेल्या दुर्देवी व ढोंगी नियमावलीचा खुलासा प्रकाशित व्हावा असे दुर्गमित्रांना आवाहन केलेले आहे.

किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांच्या मते “जंजिरे वसई किल्ल्यातील वास्तू, पोर्तुगीज ख्रिस्तमंदिरे, पेशवेकालीन मंदिरे, तटबंदी, विहिरी यांची सातत्याने होणारी दुरवस्था पाहता केंद्रीय पुरातत्व विभागाची कार्यपद्धती व त्यातील निश्चित मर्यादा लक्षात येत आहे. स्थानिक दुर्गमित्रांच्या, विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाने सातत्याने श्रमदान मोहिमा आयोजित करून जंजिरे वसई किल्ल्याचे अस्तित्व राखले पाहिजे.”