
नालासोपारा :- सार्वजनिक परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांना शिस्तीचे धडे शिकविण्यासाठी महानगरपालिकेने ‘क्लीन-अप मार्शल’ची फौज नियुक्त केली होती. या मार्शलना मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. कारवाईच्या नावाखाली काही मार्शल तोडपाणी अथवा लोकांना दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ही योजना तीन महिन्यांपूर्वी बंद झाली आहे. तरीही काही ठिकाणी क्लिन अप मार्शल अनधिकृतपणे वसुली करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
वसई विरार महानगरपालिका हद्दीत अस्वच्छ करणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी पालिकेने नेमलेले क्लीन-अप मार्शल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होते. त्यांच्या विरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. क्लीन-अप मार्शल आपले ओळखपत्र दाखवून नागरिकांना तुम्ही थुंकलात कशाला? आता दंड भरा, असे सांगायचे. काही वेळा दंड दिला तर दंडाची पावती देण्यास क्लीन-अप मार्शल नकार द्यायचे. एखादा तोंडात काही चघळताना दिसला की त्याला बाजूला घेऊन दमदाटी करायचे. एखादा नागरिक हाताला लागला की, हे क्लीन-अप मार्शल त्यांना पोलिस कायद्यांतर्गत कारवाईची भीती दाखवायचे. त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेल्यावर कायद्याच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने नागरिक दंडाची रक्कम देऊन टाकायचे. मध्यतंरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य होते. मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जात होता. यादरम्यान काहीवेळा क्लीन-अप मार्शलकडून अरेरावी व दमदाटी केल्याच्या तक्रारी मनपा अधिकाऱ्यांना आल्या होत्या.