




मुंबई, 19 जुलै 2025 — जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यातील डाव्या, पुरोगामी आणि सामाजिक न्यायवादी संघटना एकत्र येत एक व्यापक आंदोलनाची आखणी केली आहे. या लढ्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि समाजवादी नेते कपिल पाटील यांनी घेतले असून, आज मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यभर जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत 64 टार्गेट संघटनांपैकी 30 प्रमुख डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, ओबीसी संघटना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, कामगार चळवळी, विद्यार्थी संघटना आदी विविध घटकांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व संघटनांनी एकत्रितपणे जनसुरक्षा विधेयकाला “लोकशाहीच्या विरोधातील” आणि “अघोषित आणीबाणीसमान” ठरवत त्याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हे विधेयक म्हणजे संविधानातील मुल्यांवर थेट हल्ला आहे. लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.” तर कपिल पाटील यांनी हा कायदा ‘राजकीय विरोधकांना चिरडण्याचे साधन’ असल्याचे म्हणत जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले.
पुढील काही आठवड्यांत राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृती कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, निषेध मोर्चे आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची रूपरेषा लवकरच जाहीर होणार आहे.
