
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई ह्यांची वर्तणूक, त्यांचे कार्यालयीन निर्णय तसेच त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजा बाबत शेतकरी व जमीन मालकांच्या अनेक तक्रारी आहेत.जमीन मालक आपल्या जमिनीचे मोजणीबाबत मूळ दस्तऐवजाची मागणी केल्यास अनेकदा ते फाटलेले आहेत ते हरवलेले आहेत अशी बेजबाबदार उत्तरे मिळतात.मोजणीत कर्मचाऱ्यांनी कुणालातरी बेकायदेशीर साथ दिली असेल तर त्या मिळकती लगतच्या जमीन मालकाची कागदपत्रे गहाळ होतात, फाटली जातात.कर्मचारी व अधिकारी यांचा कार्यालयात उपस्थिती बाबत कुठलाही ताळतंत्र नाही. त्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांना ताटकळत वाट पहावी लागते.दलालांचा सुळसुळाट वाढलेला असून जनतेला नाईलाजाने पैसे देऊन त्यांच्यामार्फत कामे करून घ्यावी लागत आहेत.सहमालकाचा विरोध असला तरी मोजणी जबरदस्तीने करता येते अश्या परिपत्रकाचा आधार घेत कुणा एक मालकाच्या संगण्यावरू, पोलीस बंदोबस्त घेऊन ,दहशत दाखवून मोजणी केली जाते व हवे तसे नकाशे तयार केले जातात.आणि मग शेतकरी लाखो रुपये व स्वतःचा वेळ खर्च करून कोर्ट केसेस भांडत राहतो.प्रकरणे निकाली काढण्याचा कालावधी पाळला जात नाही.अनेकदा मोजणी न होताच कुणाच्या तरी खाजगी मोजणी केलेल्या नकाशा कार्यालयातच बसून तयार केला जातो. कुणाच्यातरी हितासाठी मूळ अभिलेखाला न मिळणारे जुळणारे अनेक नकाशे तयार झाल्याची चर्चा नागरिकांन मध्ये आहे.
जनतेच्या अश्या अनेक तक्रारी बाबत मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर ,पदाधिकारी व काही तक्रारदार नागरिक यांनी सोमवार दिनांक २९ जुलै रोजी पालघर येथे जाऊन पालघर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची प्रत्यक्ष भेट घेतली.जनतेच्या तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या.वरिष्ठ म्हणून आपण वसई कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या तक्रारी आपण ऐकाव्यात अशी विनंती त्यांना केली.
त्या विनंतीला मान देऊन बुधवार दिनांक ७ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १२ वाजता वसई येथील भूमिअभिलेख कार्यालयात ते उपस्थित राहणार असून जनतेच्या तक्रारी ते ऐकून घेणार आहेत.सर्व वसईकर भूमिपुत्र शेतकरी,व जमीन मालक यांच्या मोजणी व मोजणी कार्यलया बाबत तक्रारी असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात येत आहे.
