
जिल्हा परिषदेच्या पालघर सामान्य प्रशासन विभागाने सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती केल्या आहेत. या प्रक्रियेत तीन जणांना सहाय्यक प्रशासन अधिकारी,तेरा जणांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी तर अकरा जणांना वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली.
शासनाचे पदोन्नती बाबतचे वेळोवेळी बदलत असलेल्या धोरणामुळे ही पदोन्नती रखडली होती. पदोन्नतीसाठीची कागदोपत्री प्रक्रिया डिसेंबर 2018 मध्येच पार पडली होती. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,सदस्य व प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या सुधारित धोरणानुसार पदोन्नतीची ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली आहे. पदोन्नती झालेल्या कर्मचारी वर्गांना प्रशासनातर्फे आदेशाचे वितरण केले गेले. ज्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे त्यांच्या पदावर प्रतीक्षा सूचीतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची तरतूद आहे.नियमाला अनुसरून प्रशासनाने ही पदोन्नती केलेली आहे. कर्मचाऱ्यांनी नियमांना धरून काम करावे असे मत अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी यावेळी व्यक्त केले.प्रशासनाची आवश्यकता म्हणून ही पदोन्नती असून प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेल्या जागी आपले कर्तव्य बजावावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या निमित्ताने सांगितले.