पालघर, तलासरी, वसई व वाडा या चार तालुक्यातील ग्रामपंचायती

पालघर,प्रतिनिधी,दि.9 नोव्हेंबर

पालघर जिल्ह्यात पालघर, तलासरी वसई व वाडा या चार तालुक्यांमधील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. चार तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका लागल्या आहेत.सदस्य वर्गासह थेट सरपंच पदासाठी ही निवडणूक होणार आहे.

बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण अलीकडेच जाहीर झाले. यामध्ये पालघर तालुक्यातील 38 तर वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर इतर सहा तालुक्यांमध्ये आरक्षण अनुसूचित जमातींसाठी कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अलीकडेच 362 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत साठी हा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे.

डिसेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्णपणे संगणक प्रणाली द्वारे राबविण्यात यावी असे निवडणूक आयोगाने काढलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रात म्हटले आहे. 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस तहसीलदारांमार्फत तालुकास्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) स्वीकारले जातील. 5 डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. पात्र उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. 18 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

तालुका – ग्रामपंचायती
वसई – 15
पालघर – 32
तलासरी – 1
वाडा – 15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *