

प्रतिनिधी
विरार, दि. 24 – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय वसई-विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने दिला आहे. सामान्य माणसांकडून व्याजसह कर वसूल करणार्या महापालिकेने विरार-आनंदीनगर वृक्षतोडप्रकरणी जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवटकडून अद्याप दंड वसूल केलेला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल सहा महिने लोटूनही रामजीत केवट याच्याविरोधात नोटिस बजावण्यापलीकडे ठोस कारवाई केलेली नाही.
वृक्षतोडप्रकरणी वसई-विरार महापालिकेने जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवट यांना दोनदा, तर जमीन मालक अरुण चिंतामण पाटील यांना एकदा नोटिस बजावली होती. या नोटिसींना उत्तर देताना अरुण पाटील यांनी आपण ही जागा कराराने रामजीत केवट यांना बांधकामासाठी दिल्याचे म्हटले होते. तर रामजीत केवट याने त्याच्या आधीच्या खुलाशात संबंधित जागेवरील झाडे नैसर्गिक मोडली होती, असे सांगताना आपण केवळ त्यांची छाटणी व तेथील डेब्रिज काढल्याचे म्हटले होते. उलट त्याने महापालिकेलाच त्यांच्याकडे असलेले पुरावे दाखवण्यास सांगितले होते. यावर महापालिकेने पंचनाम्यादरम्यान घेतलेले जबाब आणि छायाचित्रांआधारे पुन्हा एकदा रामजीत केवट याला नोटिस बजावली होती. या नोटिसीला उत्तर देताना रामजीत केवट याने पुन्हा आपला जुनाच राग आळवला होता. तर पालिका अग्निशमन कर्मचार्याच्या मृत्यूबाबत मौन बाळगले होते.
दरम्यान, पुन्हा पाठवलेल्या नोटिसीबाबत जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवट यांनी खुलासा केला. यात त्यांनी आपण महापालिकेच्या परवानगीविना झाडे तोडल्याचे मान्य करतानाच, सदर झाडे वाईट अवस्थेत होती. त्यामुळे आपण ती तोडली, असे म्हटले होते. मात्र दिलेल्या खुलाशात झाडे तोडतेवेळी पालिका अग्निशमन दलाच्या कर्मचार्याच्या झालेल्या मृत्यूबाबत काहीही उल्लेख केलेला नाही. तर महापालिकेनेही याबाबत जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवट यांना का विचारणा केली नाही? असा प्रश्न आता वृक्षप्रेमी नागरिकांनी विचारला आहे. दरम्यान, या प्रकरणात महापालिका आयुक्त सतीश लोखंडे आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी चौकशीअंती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली होती, मात्र महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती या प्रकरणात केवळ दंड आकारण्याच्या विचारात असल्याने या प्रकरणात पाणी मुरत असल्याचेही वृक्षप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
विरारमधील जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी असलेल्या आनंदी नगरमध्ये तब्बल 10 ते 12 डेेरेदार वृक्षांची कत्तल केवळ अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जागा मालकाने केली होती. या प्रकरणी महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या वृक्षतोडीसाठी महापालिकेच्याच अग्निशमन दलाच्या कर्मचार्याला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाची ड्युटी संपल्यानंतर ही झाडे तोडण्यासाठी हा कर्मचारी येत होता, अशी माहिती परिसरातील नागरिक सांगतात.
दरम्यान, या वृक्षतोडीदरम्यान डोक्यात फांदी पडून अग्निशमन दलाच्या कर्मचार्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिकेने कारवाईबाबत कोणतीही हालचाल केली नव्हती. माध्यमांच्या पाठपुराव्यानंतर जाग आलेल्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने थोडीशी हालचाल केली, मात्र त्यांच्या या हालचालीत कारवाईबाबत कोणतीही उत्सुकता नव्हती. दरम्यान, महापालिका आयुक्त सतीश लोखंडे आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी या वृक्षतोड प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन माध्यमांना दिले होते. तर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानंतरही महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ कागदोपत्री प्रक्रियेत गुंतले होते.
दरम्यान, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या प्रकरणात जागा मालक अरुण चिंतामण पाटील यांना नोटिस बजावून खुलासा मागितला होता. महापालिकेच्या या नोटिसीला पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत खुलासा पाठवला, मात्र त्यात त्यांनी आपण ही जागा कराराने बांधकामासाठी जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवट याला दिली असल्याचे सांगून हात वर केले होते. त्यामुळे वृक्षप्राधिकरण समितीच्या उद्यान अधीक्षकांनी जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवट याला नोटीस बजावली होती. पण रामजीत केवट याने त्याच्या आधीच्या खुलाशात संबंधित जागेवरील झाडे नैसर्गिक मोडली होती, असे सांगताना आपण केवळ त्यांची छाटणी व तेथील डेब्रिज काढल्याचे म्हटले होते. उलट त्याने महापालिकेलाच त्यांच्याकडे असलेले पुरावे दाखवण्यास सांगितले होते. यावर महापालिकेने पंचनाम्यादरम्यान घेतलेले जबाब आणि छायाचित्रांआधारे पुन्हा एकदा रामजीत केवट याला नोटिस बजावली होती. या नोटिसीला उत्तर देताना रामजीत केवट याने पुन्हा आपला जुनाच राग आळवला असून, पालिका अग्निशमन कर्मचार्याच्या मृत्यूबाबत मौन बाळगले आहे. तर महापालिकेनेही नोटिसीत अग्निशमन कर्मचार्याच्या मृत्यूबाबत साधी विचारणाही केलेली नसल्याने महापालिकेच्या कारवाईबाबत साशंकताच व्यक्त करण्यात येत आहे.