

विरार (प्रतिनिधी): मागील वर्षी विरार पूर्व कारगिल नगर येथील जीवदानी संकुलजवळून गेलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान जीवदानी संकुलची पर्जन्यवाहिनी तुटली होती. परिणामी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात घरांत पाणी शिरल्याने संकुलवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते.
ही समस्या निकाली निघावी व यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा घरादारांत पाणी शिरू नये म्हणून संकुलवासियांनी पालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकड़े सातत्याने पाठपुरावा केला होता.
यंदा सुरुवातीलाच जोरदार पावसाचा अंदाज असल्याने आणि जीवदानी संकुलवासियांची समस्या लक्षात घेऊन; या वर्षी प्रधान्याने या पर्जन्यवाहिकेचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे जीवदानी संकुलमधील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
प्रभाग-२८ च्या नगरसेविका हेमांगी पाटील, समाजसेवक विनोद पाटील, स्वप्नील ( बाळा) पाटील यांनी स्वतः या कामी विशेष पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता.
विशेष म्हणजे या कामाची पाहणी गुरुवारी वसई-विरार महापालिकेचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत प्रभाग-२५ च्या नगरसेविका मीनल पाटील याही उपस्थित होत्या.
या बहुमोल सहकार्यासाठी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील, स्थायी समिती सभपती प्रशांत राऊत, वसई-विरार महापालिकेचे शहर अभियंता राजेंद्र लाड़ साहेब, वाय. के. क्रीड़ा मंडळाचे अध्यक्ष सुहास (दादा) पाटील, अभियंता भूषण रानमाळे आणि पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांचे संकुलवासीयांनी मनःपूर्वक धन्यवाद मानले आहेत.