आज सकाळी जेष्ठ विधीज्ञ अख्तर ह्यारिस यांचे देहावसान झाले. अनंत मधुर आठवणींच्या स्मृती आमच्यापाशी ठेवुन ते निघुन गेले.त्यांना आमची भाव पुर्ण श्रद्धांजली. आज कोर्ट चालु असते तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोर्टहाँलमध्ये खचखच गर्दी झाली असती याबद्दल माझ्या मनात यत:किंचितही शंका नाही. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या वकीलांना श्रद्धांजली वाहाण्याची वेळ येई तेव्हा तेव्हा हयारिससाहेब अनोख्या शैलीत त्यांना श्रद्धांजली वाहत. अशा दिलदार व्यक्तिमत्वाच्या श्रद्धांजलीसमई कोण गैरहजर राहील?
ह्यारिस साहेबांनी कधीही कोणाशीही शत्रुत्व धरले नाही. कधीही मैत्रीला अंतर दिले नाही. कधीही नवख्या वकीलाची थट्टा केली नाही. कधीही कुणालाही कमी लेखले नाही. आपल्या ईंग्रजी आणि उर्दु भाषेच्या प्रभुत्वाबाबत कधीही गर्व मिरवला नाही. उलट आपली रसवंती सदैव ईतरांना रिझवण्यासाठी वापरली. विनोदी किस्से सांगुन ह्यारिस साहेबांनी कितीतरी वेळा हसवुन हसवुन आमची मुरकुंडी वळवली आहे.कितीही वेळा त्यांचे जोक्स आणि शेरोशायरी ऐकुन आम्हाला कधीही कंटाळा आला नाही. किंबहुना प्रत्येक वेळी नवीन अर्थ सापडत गेला.
आपली वकीली देखील त्यांनी त्यांच्या उमद्या स्वभानुसार केली.कोर्टात आपल्या पक्षकरांसाठी ह्यारिस साहेब कोणत्याही स्थरावर जात. समोरच्या वकीलांवर हल्ला चढवीत. पण कोर्टाच्या बाहेर मात्र जणु काहीच घडले नाही असे दाखवत.आपल्या हास्यविनोदात समोरच्या वकीलालाही ओढुन घेत.मात्र अजुनही मला त्यांनी कोर्टात कोट केलेले केस लाँ सापडलेले नाहीत. त्यांनी देण्याचे अगदी कबुल करुनही!त्यांच्या वकीलीची हिच खरी खुबी होती.
ह्यारिस साहेबांचा आमच्या कुटुंबावर विशेष लोभ होता. अभिमान देखील होता. माझे भाऊ बिशप थाँमस डाबरे यांच्याविषयी त्यांना कमालीचा आदर होता.नानांना ते आपला लहान भाऊ समजत.मला उमेदीच्या काळात त्यांनी प्रचंड प्रोत्साहन दिले. आमच्या कौटुंबिक नातेसंबंधाबद्धल त्यांनी अनेकदा गौरोवोद्गगार काढले आहेत. मनाच्या निर्मळपणाशिवाय ते कुणाला शक्य नाही.
थोडक्यात ह्यारिस साहेबांसारखे दुसरे व्यक्तीमत्व होणार नाही. दिदारे चमन मे———।
ह्यारिस साहेब तुमचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. आता अल्लाहाच्या दरबारात आपली सेवा रुजु करुन घेतली जावो.
-अँड.नोएल डाबरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *