🔴 मोठे मासे सोडून छोट्या माशांवर कारवाई; भूमाफिया दारा-रंधाचे दलाल मात्र मोकाट

🔴 प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्वयंघोषित समाजसेवक ब्रिजेश यादव व मनिष ठाकूर यांना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट

🔴 महसूल, वन विभाग तसेच पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून स्वतः ची जबाबदारी झटकताना प्रयत्न

🔴 दारा-रंधा कंपनीपुढे प्रशासन नतमस्तक

वसई(निलेश नेमण)-३ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजवली-वाघराळ पाडा याठिकाणी घरावर दरड कोसळून २ जणांचा मुत्यु झाल्याची घटना घडली होती.दरम्यान या दुर्घटनेला प्रशासनाचा भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला असून येथील अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.दुसरीकडे या घटनेनंतर झोपेचे सोंग घेतलेल्या पालिका प्रशासनाने ४ चाळ माफियांवर गुन्हे दाखल करून व तेथील काही रूम तोडून नेहमीप्रमाणे कारवाईचे सोपस्कार पार पाडले आहेत.परंतु येथील मुख्य भूमाफियां दारा-रंधा व त्यांचे दलाल व स्वयंघोषित समाजसेवक ब्रिजेश यादव व मनिष ठाकूर यांच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे मोठे मासे सोडून छोट्या माशांवर कारवाई झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
राजवली-वाघराळ पाडा परिसरात मालकी तसेच वनविभागाचे डोंगर पोखरून, आदिवासी – शासकीय जागा हडप करत, नैसर्गिक नाले बुजवून बेकायदेशीर पणे चाळी उभारल्या गेल्या आहेत.विशेष म्हणजे या चाळी दारा-रंधा या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या दोघा भावांच्या अधिपत्याखाली उभारण्यात आल्या आहेत.याठिकाणी गुंडच भूमाफिया बनल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी चाळी उभारण्यासाठी दारा-रंधाने स्वयंघोषित समाजसेवक ब्रिजेश यादव, मनिष ठाकूर यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे.त्यानुसार या दुकलीनी पद्धतशीर पणे पालिका, महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दक्षिणा पोचवून त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.एकप्रकारे हे दोन्ही समाजसेवक दारा-रंधाचे दलाल बनल्याचे चित्र पहावयास मिळत होते.असे असताना पालिका प्रशासनाने मुख्य भूमाफियां दारा-रंधा व त्यांचे दलाल व स्वयंघोषित समाजसेवक ब्रिजेश यादव व मनिष ठाकूर यांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु महसूल, वन विभाग तसेच पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून स्वतः ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.वास्तविक प्रशासन दारा-रंधा कंपनीपुढे नतमस्तक झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट देत आहेत.त्यामुळेज्यांनी डोंगर पोखरले आणि चाळी उभारल्या ‘त्या’ भूमाफियांवर कारवाई कधी? असा सवाल वसईकर जनता विचारू लागली आहे.
याठिकाणी गेल्या ४ वर्षांपासून राजावली-वाघरालपाडा येथे डोंगर उध्वस्त करून,हजारो झाडांची कत्तल करून तेथील माती,दगड अनधिकृतपणे चोरी करण्याचे काम चालू आहे.डोंगर सपाट केल्यावर तेथे चाळी बांधण्यात आल्या.संपूर्ण ७० एकर जागेवर चाळीचे जंगल उभारण्यात आले. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जागेवरील पर्यावरण नष्ट करून या भूमाफियांनी कब्जा केलेला आहे.असे असतानाही पालिका प्रशासन, वसईच्या तहसीलदार,प्रांतअधिकारी तसेच वन विभागाने कुठलीच कारवाई केली नाही.विशेष म्हणजे २०१८ ला याठिकाणी कारवाई साठी गेलेल्या वसई विरार पालिकेच्या अतिक्रमण पथकावर येथील भूमाफियांनी आपल्या हस्तकां मार्फत पालिकेच्या अतिक्रमण पथकावरच हल्ला चढवत दगडफेक केली होती तसेच पालिकेचे पोकलण,जेसीबी व इतर वाहने जाळण्यात आली होती.परंतु ४ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेतून काहीच बोध या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजही घेतलेला दिसत नाही.याठिकाणी सुरू असलेल्या भुमाफियांच्या अतिक्रमणाबाबत अनेक समाजसेवक, पत्रकार बांधवांनी संबंधित विभागाला सूचित करून राजवली-वाघराळ पाडा परिसरात कारवाई करण्याची मागणी केली होती.तक्रार,पाठपुरावा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत.जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार करून या संपूर्ण प्रकाराबाबत कळविण्यात आले होते.परंतु त्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. एकप्रकारे प्रशासनाने याठिकाणी कारवाई करण्याऐवजी भुमाफियांनाच सहकार्य करण्याचा प्रयत्न केला.परिणामी त्या ठिकाणी दुर्घटना घडली व दोन जणांचा नाहक बळी गेला.
वसई तालुका हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो.एकीकडे समुद्र तर दुसरीकडे तुंगारेश्वर अभयारण्य आहे.एकूणच वसई तालुका हा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असा तालुका आहे.वसईला मुंबईची फुफ्फुसे म्हणून म्हटले जाते.अलीकडेच याच वसई तालुक्याच्या साधन संपत्तीला लुटण्याचे काम येथील परप्रांतीय भुमाफियांनी सुरू केले आहे.त्याची अनेक उदाहरणे तुंगारेश्वर अभयारण्या लगतच्या संवेदनशील क्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे.या भुमाफियांनी संपूर्ण संवेदनशील
तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून तुंगारेश्वर अभयारण्यातील साधन संपत्तीची बेसुमार लूट आणि नुकसान केले आहे.आता येथे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची नजर शहर क्षेत्रालगत असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या वनांवर व त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी जमिनीवर,डोंगराळ भागावर पडलेली आहे.
गाव मौजे राजवली येथे असणाऱ्या वनक्षेत्राच्या व इतर खाजगी जागेतील डोंगराळ भागात अनेक वर्षापासून आदिवासी बांधव वास्तव करत आलेले आहेत.व या आदिवासी बांधवांमुळे येथील जंगल व साधन संपत्ती सुरक्षित राहिलेली होती.परंतु या क्षेत्रावर भुमाफियांची
वक्रदृष्टी पडली व त्यांनी तेथील आदिवासी बांधवांना फसवणूक, काहींना लालच देऊन जमिनी बलकावयास बळकावायला सुरवात केली.असे करताना त्यांनी त्या जमिनीवर असलेली अनेक जुनी झाडे तोडली,तेथे असलेल्या अनेक पाण्याचे स्त्रोतांना बुजवले,
नैसर्गिक नाले बुजवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथे अस्तित्वात असलेले संपूर्ण डोंगर पोखरून लाखो ब्रास मातीची चोरी करून त्या डोंगरी भागाला सपाट करण्याचे पाप या भुमाफियांनी केले आहे.संपूर्ण हिरवेगार असणारे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला परिसर भुईसपाट करून वाळवंट करून टाकले.विशेष म्हणजे भुमाफियां लॉबी हे सर्व डोळ्यादेखत करीत असताना महसुली अधिकारी मात्र गप्प बसून पाहत होते.विशेष म्हणजे अनेकांनी पालिका अधिकारी, प्रांताधिकारी,तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी यांना या प्रकाराची जाणीव करून दिली होती परंतु तिकडे दुर्लक्ष केले.परिणामी भुमाफियांनी संपूर्ण डोंगर भुईसपाट करून त्याठिकाणी बेकायदेशीर पणे चाळी उभारल्या.


प्रशासनाचा कारभार गुंडांच्या इशाऱ्यावर?

उत्तरं प्रदेश मधून मागवलेल्या ज्या दोन हजार भाडोत्री गुंडाकरवी पालिकेच्या पथकावर हल्ला चढवला होता.याच ठिकाणी पुन्हा एकदा दारा-रंधा अनधिकृत पणे चाळींचे साम्राज्य उभे करत आहेत.परंतु पालिका, महसूल व वन विभाग एकमेकांकडे बोट दाखवून दारा-रंधा या भावांची मर्जी राखताना दिसत आहे. त्यामुळे या तिन्ही विभागाचा कारभार गुंडांच्या इशाऱ्यावर चालतो की काय असा संभ्रम शहरवासीयांमध्ये निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याठिकाणी चाळी उभारताना दारा-रंधा कंपनी ने वनविभागाचे डोंगर पोखरले, नैसर्गिक नाले बुजवूले पण त्याविरोधात आजपर्यंत कारवाई झालेली नाही. परिणामी शासकीय अधिकारी दारा-रंधाच्या दहशतीखाली काम करत असल्याचे अधोरेखित होते.राजवली-वाघराळ पाड्यात दारा-रंधा आपल्या हस्तकां मार्फत पुन्हा बिनदिक्कत पणे अनधिकृत चाळी उभारत आहे.परंतु संबंधित यंत्रणेने दारा-रंधा कंपनीपुढे सपशेल नांगी टाकल्याचे दिसून येत आहे.राजवली-वाघराळ पाडा परिसरात वनविभागाचे डोंगर ,आदिवासी – शासकीय जागा तसेच नैसर्गिक नाले बुजवून सुमारें ५०० एकर वर बेकायदेशीर पणे चाळींचे साम्राज्य निर्माण करणारा गुंड दारा उत्तर प्रदेशातून पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाना आपल्या तालावार नाचवत आहे.विशेष म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये एका नामचीन राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या तसेच विविध गुन्ह्यातील आरोप असलेला अरविंद उर्फ दारा सिंग सद्या जिल्ह्यातील महसूल, वन व पालिका या विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर दिल्लीतून दबाव आणत आहे.राजवली-वाघराळ पाडा परिसरात ५०० एकर वर दारा-रंधाने चाळी उभारल्या होत्या.परंतु पालिकेला उशिरा जाग आल्याने त्याठिकाणी २१/०२/२०१८ रोजी पालिकेचे विशेष पथक पोलीस संरक्षणात पोचले होते.यावेळी दारा-रंधा यांनी आणलेल्या दोन हजार गुंडांनी पोलीस संरक्षणातील पालिका पथकावर हल्ला चढवत दगडफेक केली,जाळपोळ केली,वाहने जाळली,पोलिसांना मारहाण केली होती.या गंभीर घटनेनंतरही पालिकेने दारासमोर लोटांगण घातले.शिवाय जाळपोळ, दंगल, सरकारी वाहनांचे नुकसान, एम.आर.टी.पी अशा गंभीर गुन्ह्याची नोंद होणे अपेक्षित असताना पालिका व पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करत किरकोळ कलमे दाखल करून आरोपी आणि सुत्रधारांची जामिनावर त्वरित कशी सुटका होईल याची काळजी घेत २४ जणांवरच गुन्हे नोंदवले होते.
आज राजवलीतील जे सरकारी क्षेत्र उध्वस्त झाले,त्यावरून दारावर गंभीर गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. परंतु महसूल विभागाकडे त्याचा साधा पंचनामाही नाही. दाराने किती एकर च्या क्षेत्रात डोंगर नष्ट केले आहेत, किती ब्रास मातीचे उत्खनन केले आहे,किती ब्रास मातीचा भराव केला आहे, कोणते व किती नैसर्गिक नाले नष्ट केले आहेत. अश्या गंभीर बाबींचा तपशील महसूल विभागाकडे उपलब्ध नाही आहे.एकीकडे चाळी उभारण्यासाठी वनविभागाचे डोंगर पोखरले, नैसर्गिक नाले बुजवूले पण महसूल किंवा वनविभागाने त्यावेळी या दारा-रंधा विरोधात कारवाई करण्याची साधी तसदी घेतली नाही.जर त्यावेळीच दाराचा दबाव जुगारून कारवाई केली असती तर तेथील हरित पट्टा नष्ट झाला नसता. परंतु पालिका,महसूल व वन विभाग या तिन्ही विभागा च्या उदासीनतेमुळे दाराने आपले राजवलीत साम्राज्य उभे केले.


४ वर्षांपूर्वी भूमाफियांनी केलेला हल्ल्याचा पालिका अधिकाऱ्यांना विसर?

दरम्यान दारा-रंधा यांनी आणलेल्या दोन हजार गुंडांनी पोलीस संरक्षणातील पालिका पथकावर
हल्ला चढवत दगडफेक केली,जाळपोळ केली,वाहने जाळली,पोलिसांना मारहाण केली. परंतु पालिकेचे सहा. आयुक्त आणि पोलीस यांनी दंगल, जाळपोळ, दगडफेक ,पोलिसांना झालेल्या मारहाणीची कलमे न नोंदवता किरकोळ दाखल करून आरोपी आणि सुत्रधारांची जामिनावर त्वरित कशी सुटका होईल याची काळजी घेत केवळ २४ जणांवरच गुन्हे नोंदवले होते.विशेष म्हणजे हल्ल्यानंतरही पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी गुंडांनाच साथ दिल्याचे दिसून येते.त्यामुळे सहा. आयुक्तांच्या फिर्यादीत उल्लेख असलेले २४ गुंड शंभरहून अधिक पोलीस,पालिकेचे शंभरहून अधिक कर्मचारी असे दोनशेहून अधिक लोकांच्या शासकीय ताफ्यावर कशी दगडफेक, जाळपोळ करु शकतात असा सवाल उपस्थित होत आहे.दुसरीकडे या दगडफेक व जाळपोळ प्रकरणानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत त्याठिकाणी कारवाईसाठी वसई तहसिल कार्यालया बाहेर १७ दिवस आंदोलन केले होते.यावेळी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दारा शिंह वर मोक्का लावण्याची मागणी केली होती.विशेष म्हणजे मनसे च्या या तालुका पातळीवरील आंदोलनाची दखल थेट राज ठाकरे यांनी देखील दखल घेतली होती.शिवाय वसईत घेतलेल्या एका जाहीर सभेत यावर भाष्यही केले होते.


पालिका,महसूल,वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दारा-रंधाकडे चाकरी

राजवली वाघराळ पाडा परिसरात वनविभागाचे डोंगर ,आदिवासी – शासकीय जागा तसेच नैसर्गिक नाले बुजवून सुमारें ५०० एकर वर बेकायदेशीर पणे चाळींचे साम्राज्य निर्माण करणारा गुंड दारा उत्तर प्रदेशातून पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाना आपल्या तालावर नाचवत आहे. उत्तर प्रदेश मध्ये एका नामचीन राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या तसेच विविध गुन्ह्यातील आरोप असलेला अरविंद उर्फ दारा सिंग सद्या जिल्ह्यातील महसूल, वन व पालिका या विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर दिल्लीतून दबाव आणताना आहे. विशेष म्हणजे दारा-रंधाच्या या बेकायदेशीर कृत्याला वसई विरार मधील काही स्वयंघोषित समाजसेवक साथ देताना दिसत आहेत.ब्रिजेश यादव, मनिष ठाकूर हे दोन स्वयंघोषित समाजसेवक सद्या दारा-रंधाची दलाली करत आहेत.एकीकडे आपण समाजसेवक असल्याचे भासवून हे दोन्ही स्वयंघोषित समाजसेवक जनतेचीही दिशाभूल करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *