

चेन्नई : अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती नाजूक झाली होती.
बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन काल एमजीएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेला होता.
संपूर्ण भारताला एसपी बालसुब्रमण्यम यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.
सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.