

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता आणि इतरांना आधार देणारा सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.प्रा.विलास वाघ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर धडपडत राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एक महाविद्यालय त्यांनी उभे केले होते. पुणे जिल्ह्यातील भुकूम इथे दलित कुटुंबांना घेऊन त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला होता. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. ‘सुगावा’ हे मराठीतील मासिक देखील ते चालवत होते. त्यातूनच पुढं सुरू केलेल्या सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शक ठरू शकतील अशी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती. त्यांच्या ‘सुगावा’ मासिकाला २००३ सालचा ‘इंटरनॅशनल मिशन कॅनडा’ पुरस्कार देखील मिळाला होता.