

दिनांक ३० जून २०१९ रविवार जेष्ठ कृ १२ रोजी किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत आयोजित पालघर जिल्ह्यातील सकवार गावातील टकमक गडाच्या महाश्रमदान मोहीम विक्रमी प्रतिसादात संपन्न झाली. टकमक गडाची दमछाक करणारी भक्कम चढाई, ७० हुन दुर्गमित्रांचा सक्रिय सहभाग, किल्ल्यावरील चार टाक्यांची स्वच्छता, श्री शिवमंदिराची पुनर्बांधणी, इतिहास मार्गदर्शन इत्यादी बाबीं मोहिमेतील विशेष ठरल्या. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या श्रमदान मोहिमेची सुरुवात गडदेवता, वास्तुदेवता पूजनाने करण्यात आली. स्थानिक गडकोटांच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणाऱ्या युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर संघटनेच्या प्रतिनिधींनी आजच्या मोहिमेत सक्रिय योगदान दिले. मोहिमेच्या सुरुवातीस किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांनी दुर्गमित्रांना इतिहास मार्गदर्शन केले. गडावरील मुख्य पठारावरील काताळ दोन टाक्यांची दुर्गमित्रांनी अत्यंत परिश्रमाने पूर्ण स्वच्छता केली. यातील मुख्य पिण्याच्या टाक्यातील मोठे चार चिरेबंदी खडक दुर्गमित्रांनी टाक्यांतून बाहेर काढून ठेवले. या टाक्यांतील सर्व मातीचा गाळ, प्लास्टिक कचरा, लहान दगड इत्यादी पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या तरुणींनी गडावरील पूर्णपणे उध्वस्त शिवमंदिराच्या संवर्धनासाठी श्रमदान केले. यावेळी मंदिराच्या चौथऱ्याजवळ विखुरलेले दगड, माती याचा उपयोग करून मूळ मंदिराचे अस्तित्व राखण्यात दुर्गमित्रांनी यश मिळवले. या मंदिराच्या जवळ असलेल्या दोन्ही तोफा मंदिराच्या अंतर्गत भागात अत्यंत परिश्रमाने सुस्थितीत ठेवण्यात आल्या. या स्वच्छता मोहिमेत जुने नक्षीकाम केलेले पण अर्धवट तुटलेले जाते उपलब्ध झाले. आजच्या मोहिमेत मोठ्या संख्येने उपलब्ध झालेले मनुष्यबळ पाहता दुर्गमित्रांनी दुपारच्या सत्रात कपारीतील आणखी दोन मातीने, दगडांनी बुजलेल्या काताळ टाक्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. यातील मोठ्या प्रमाणावर गाळ, लहान दगड काढण्यात प्रचंड दमछाक झाली. टकमक गड संवर्धनासाठी आयोजित महाश्रमदान मोहिमेचे यंदा सलग बारावे वर्ष पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यात गडावरील विस्मृतीत गेलेल्या ऐतिहासिक वास्तूविशेषांवर मुक्कामी अभ्यास, संवर्धन मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके, गडाची दमछाक करणारी चढाई, वाऱ्याचा वाढता प्रभाव यांचा सामना करीत झालेल्या या दुर्गसंवर्धन मोहिमेचे महाराष्ट्रातील दुर्गमित्रांनी विशेष अभिनंदन केलेले आहे.
युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातवी यांच्या मते “टकमक गडाची संवर्धन मोहीम ही वर्षभर उपलब्ध होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने विशेष बाब असून जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांवर महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करणे महत्वाचे ठरेल.”
किल्ले वसई मोहिमेचे संवर्धन प्रमुख आतिष पाटील यांच्या मते “टकमक गडाच्या संवर्धनासाठी यंदा बारावे वर्षं पूर्ण झाले ही विशेष बाब असून किल्ल्यावरील अज्ञात वास्तु प्रकाशात आणण्यासाठी नियोजित आराखडा लिखित स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे.”
राई गावातील दुर्गमित्र भरत पाटील यांच्या मते “तरुणांचा दुर्गसंवर्धन मोहिमेत वाढता सहभाग व सक्रिय योगदान पाहता आगामी दुर्गसंवर्धन चळवळीत गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर संवर्धन मोहिमा करणे शक्य होईल अशी खात्री वाटते.”