
वसई : (प्रतिनिधी) : करोनासारख्या महामारीला थोपवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात करोनाला हरवण्यासाठी शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. सर्व खाजगी व्यवहार त्यामुळे ठप्प झाले आहेत. औद्योगिक कारखाने, सार्वजनिक व खाजगी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच नोकरदारांनादेखील घरीच बसावे लागत आहे. टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हा वसई तालुक्यातील तबेला मालकांना बसला आहे. दुधाला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने तबेला मालकांना आर्थिक नुकसानाचा फटका बसला आहे. मिठाई बनवण्याचे काम ठप्प असल्याने त्यासाठी दुधाला असलेली मागणी आपसूकच कमी झाली आहे. अशा काळात इतर व्यवसायिकांबरोबरच तबेला मालकांनाही नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
वसई पश्चिम परिसरात असलेल्या तबेल्यांच्या संख्येपेक्षा वसई पुर्व पट्टीत तबेल्यांची संख्या मोठी आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तर मोठ्या प्रमाणात तबेले असून त्याठिकाणी रोज हजारो लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते. वसई तालुक्यातील दुध डेअरींबरोबरच भिवंडी, पालघर, मुंबई व ठाणे परिसरात या तबेल्यांतील दुध विक्री केले जाते. मात्र सध्या करोनाचे सावट असल्याने तबेला मालकांकडील दुध विकले जात नाही. सध्या सर्वत्र मिठाई बनविण्याचे काम ठप्प झाले असून त्यासाठी लागणार्या दुधालादेखील असलेली मागणी आपसुकच कमी झाली आहे. टाळेबंदीत वसईतील तबेला मालकांना त्याचा असा आर्थिक फटका बसला आहे. चिंचोटी येथील भजनलाल दुध व्यवसायिक प्रसिद्ध आहे. येथील दुध, दही, लस्सी, थंडाई, मिठाई व दुधापासून बनवलेले पदार्थ फेमस असून वसई तसेच भिवंडी, मुंबई येथील नागरिकांची झुंबड असते. मात्र सध्या टाळेबंदीमुळे या व्यवसायिकालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
