शेतजमीन विकत घेण्यासाठी बनवला बोगस शेतकरी दाखला

वसई, प्रतिनिधी
वसई तालुक्यातील मौजे समेळ येथील शेतजमीन विकत घेण्यासाठी माजी नगरसेवक राजेश ढगे व त्याचा भाऊ यतीन ढगे यांनी बोगस शेतकरी दाखला बनवून सदर जमिन अनधिकृतरित्या खरेदी केल्याचा आरोप समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते टेरेन्स हॅन्डीकिस यांनी केला असून या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याबाबत तसेच शासनाचे खोटे दस्तावेज बनवल्याबाबत ढगे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीदेखील केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना टेरेन्स हॅन्डीकिस यांनी सांगितले की, माजी नगरसेवक राजेश ढगे व यतीन ढगे यांनी मौज समेळ येथील जमीन विकत घेण्यासाठी देवगड तालुक्यातील तिलोंट या गावामध्ये आपल्या आईच्या नावाने जमीन असल्याचा बनावट सातबारा बनवून त्या आधारावर स्वत:ही शेतकरी असल्याचे भासवून मौजे समेळ येथील शेतजमीन विकत घेतली आहे. मात्र खरे पाहता त्यांच्या आईच्या नावावर तिलोंट या गावात कोणतीही जमीन नसून निव्वळ समेळ येथील शेतजमीन विकत घेण्यासाठी हा सर्व बनाव करण्यात आला आहे. सदर प्रकरणी टेरेन्स हॅन्डीकिस यांनी वसईचे तहसीलदार व पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार दाखल केली असून माजी नगरसेवक राजेश ढगे व यतीन ढगे यांच्यावर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *