
वसई, ३ ऑगस्ट २०२५ – वसईतील पर्यावरणस्नेही, शांत, आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या परिसरातील भूमिपुत्र शेतकरी आणि रहिवाशांनी टॉवर संस्कृतीच्या आक्रमणास ठाम विरोध करत रविवारी “ऐतिहासिक निर्धार चौक सभा” घेतली. या सभेत “मी वसईकर अभियान” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली मुळगावकरांनी विकासकांच्या अतिक्रमणाच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली.
बिना पायाभूत सुविधा टॉवरसाठी परवानगी नाही!
सभेत स्पष्टपणे ठरवण्यात आले की, गावात शुद्ध पिण्याचे पाणी, दोन्ही बाजूंनी पदपथ (फुटपाथ), सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सिव्हेज प्लांट), आणि गटार व्यवस्था अशा मूलभूत नागरी सुविधा अस्तित्वात येईपर्यंत कोणत्याही टॉवर बांधकामास परवानगी दिली जाणार नाही. नागरिकांचा हा ठाम निर्धार प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व दुर्लक्षावर एक चपराक ठरणार आहे.
जमीन विकासकांना विकणार नाही: मुळगावकरांचा ठाम निर्णय
गावातील भूमिपुत्र शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की, स्वतःच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत टॉवर बांधकामासाठी विकासकांना विकल्या जाणार नाहीत. या भूमिकेला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, पूर्वीची एकजूट आजही कायम असल्याचे सभा ठिकाणी ठासून सांगण्यात आले.
“मी वसईकर अभियान”चा व्यापक लढा सुरू
“मी वसईकर अभियान” या संघटनेने आता वसईतील अन्य गावकरी संघटना, स्थानिक संस्था, पर्यावरण प्रेमी गट यांच्यासोबत एकत्र येऊन, गावच्या हरित पट्ट्याचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
मिलिंद खानोलकर यांनी सांगितले, “विकासाला आम्ही विरोध करत नाही, पण तो शाश्वत आणि गावाच्या सामाजिक, भौगोलिक रचनेला अनुकूल हवा. झोपडपट्ट्यांचा, सांडपाण्याचा व पर्यावरणाचा बोजा वाढवणारे अनियंत्रित टॉवर म्हणजे विनाशाचे आमंत्रण आहे. आम्ही मुळगावकर, आमचा वसई आणि आमचा पर्यावरणाचा हक्क आम्ही सोडणार नाही.”
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विकासक आणि प्रशासन यांच्यातील बिनधास्त साटेलोटे, आणि ग्रामस्थांच्या अनुमतीशिवाय दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्यांमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महानगर नियोजनाची दिशा लोकहिताच्या विरोधात जात असल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम, MRTP कायदा, आणि ग्रामसभा संमती नियमांचा अवमान केल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा दिला आहे.
वसईचे मुळगाव, जे आपल्या निसर्गसंपन्नतेसाठी ओळखले जातात, तिथे विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश आणि सामाजिक विस्थापन होऊ नये, म्हणून मुळगावकरांची ही आंदोलनाची ठिणगी आता वणव्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ही लढाई केवळ बांधकामाविरोधात नाही, तर आपला हक्क, पर्यावरण आणि भविष्यातील वसईकरांच्या अस्तित्वासाठी आहे.
