प्रतिनिधी

विरार- मागील दीड वर्षे शिवसेना नेते एकनाथ शिंदे व मनसे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात सुरु असलेल्या ‘राजकीय कुरघोड़ी’च्या राजकारणात अखेर अविनाश जाधव यांनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हाकेला साद देत अविनाश जाधव यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर समुद्रकिनारा स्वच्छतेसारखा ‘पथदर्शी’ कार्यक्रम ठेवून सर्वसामान्य जनतेच्या प्रशंसेला पात्र ठरले असताना; ठाण्याचा वाघ आणि त्याचे वसई-विरार, पालघर, ठाणे आणि भिवंडीतील जिल्हाध्यक्ष बछडे झोपा काढताना दिसत आहेत.

मागील एक वर्षात विविध कारणांमुळे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव चर्चेत आले होते. कोविड संक्रमण काळात ठाण्यातील रुग्णालयात झालेला भ्रष्टाचार, वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना केलेली शिविगाळ व वसई-वालीव कोविड रुग्णालयातील अनागोंदी अशा विविध प्रकरणांच्या माध्यमातून जाधव यांनी अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आस्तित्व व प्रतिष्ठा यांनाच धोका निर्माण होईल, अशी स्थिती निर्माण झाल्याने आयुक्त गंगाथरन डी. यांना केलेल्या शिविगाळ प्रकरणात अविनाश जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला गेला. ठाणे रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणातही त्यांना ‘कोर्टा’ची पायरी दाखवली गेली.

मात्र या प्रकरणात संयम राखत अविनाश जाधव यांनी राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळींवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. एकीकडे शिवसेनेला अंगावर घेतानाच; दुसरीकडे पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम अविनाश जाधव करत आहेत.

त्या तुलनेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे अन्य जिल्हाप्रमुख आळसावलेले आहेत. पक्षनेत्यांकडून कार्यकर्त्यांना कार्यक्रमच येत नसल्याची व बळही मिळत नसल्याची खंत शिवसैनिकांत आहे.

ठाणे-पालघर या दोन जिल्ह्याचा कार्यभार व अन्य जिल्ह्याचीही जबाबदारी अविनाश जाधव यांच्या एकटयाच्या खांद्यावर आहे. इतक्या व्यापानंतरही अविनाश जाधव पायाला भिंगरी बांधून कार्यकर्ता व संघटन बांधणीत उजवे ठरले आहेत.

तर ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, पालघर, डहाणु या भागात ही जबाबदारी राजेश शहा यांच्याकडे आहे. भिवंडीत प्रकाश पाटील; तर पालघर उर्वरित भाग व वसई-विरारचा भार वसंत चव्हाण यांच्यावर असताना हे सगळे मात्र सुप्तावस्थेत आहेत.

कोणताही विशेष कार्यक्रम नसल्याने शिवसैनिकांची अवस्था ‘मोघल’ सैनिकांसारखी झाली आहे. आगामी महापालिकांच्या तोंडावर शिवसेनेत हीच स्थिती राहिली तर शिवसेनाच संपुष्टात येईल, अशी चिन्हे आहेत.

मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांचा आक्रमकपणा सगळ्यांनी पाहिला होता. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी बविआ नेत्यांच्या तोंडाला ‘फेस’ आणला होता. शिवसैनिकांतही ‘प्राण’ फुंकले होते.

त्या तुलनेत या वेळी मात्र एकनाथ शिंदे कचखाऊ भूमिका घेत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांचेही अवसान गळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *