
नायक गेले….खलनायक कायम राहिले!

मागील काही दिवसांत वसई-विरार महापालिकेतून एकामागोमाग एक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. या सगळ्यावर कळस म्हणजे महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. शिवा रेड्डी हेच शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांना २५ लाख रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. या प्रकरणातून आणखी काही प्रकरणे बाहेर येतीलही! याबाबतची शक्यता धनंजय गावडे यांनीही व्यक्त केली आहे.
याचाच अर्थ वसई-विरार महापालिकेचे अधिकारी भ्रष्टाचाराच्या डोहात किती आकंठ बुडाले आहेत, हेच स्पष्ट होते.
वसई-विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेतील अधिकाºयांनी केवळ भ्रष्टाचार करण्यापलीकडे कोणतेही काम केले नाही. आज वसई-विरार शहर ओळखले जाते, ते केवळ अनधिकृत बांधकामांसाठीच!
इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहत असताना; त्यांना देण्यात येणाºया सोयीसुविधांकडे मात्र कानाडोळाच केला गेला. अफाट वाढणारी बांधकामे पालिका अधिकाºयांच्या पथ्यावरच पडली. यातून या अधिकाºयांनी अफाट माया जमवली. त्यांना साथ मिळाली होती ती कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांची! यातून एक भ्रष्टाचाराची मोठी साखळी निर्माण झाली. या साखळीने जितके या शहराला आणि येथील नागरिकांना ओरबाडता येईल तितके ओरबाडले.
या बेबंदशाहीमुळे महापालिकेत विरोधकांचेही काही चालले नाही. ज्यांचे चालले नाही, ते या प्रवाहाबाहेर फेकले गेले. तर काही या साखळीचेच एक भाग झाले. या सगळ्यांमुळे महापालिकेत मात्र नागरिकांना कोणी विचारेनासे झाले.
अधिकारीवर्गाने तर नागरिकांच्या तक्रारींची कधी दखलही घेतली नाही. साहजिकच ही भ्रष्टाचाराची कीड आतापर्यंत बेसुमार वळवळत राहिली.
पण या भ्रष्टाचाराच्या किडीला काही प्रमाणात का होईना ठेचण्याचे काम केले ते नवनियुक्त आयुक्त सतीश लोखंडे आणि विरोधक म्हणून महापालिकेत आलेले शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी! आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचार पाहून आयुक्तांचेही डोळे विस्फारले. त्यांनी तात्काळ काही कामे निकाली काढली.
महापालिकेच्या अस्तव्यस्त कारभाराला चाप लावला. कंत्राटदारांचा अतिरिक्त भरणा कमी केला. तर काही अधिकाºयांना ‘त्यांची’ जागा दाखवून दिली. सत्ताधारी, कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी पालिका लुटल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.
त्यामुळे आयुक्तांनीही पदभार स्वीकारून कामाला लागताच; वसई-विरारमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आयुक्तही येणाºया तक्रारींचा तातडीने निपटारा करत होते. सोबतच पालिकेचा कारभार सुरळीत, पारदर्शक करून; नागरिकांना प्रत्येक माहिती पाहता येईल, या अनुषंगाने महापालिकेची वेबसाईटवर अपडेट केली.
या सगळ्यामुळे भ्रष्ट पालिका अधिकाºयांच्या पोटात गोळा उठणे साहजिकच होते. पण हे भ्रष्ट अधिकारीही त्यांना ताकास तूर लागू देत नव्हते. कारण ही कीडच इतकी फोफावली आहे की, आयुक्तांना हे अधिकारी असहकार्य करू लागले आहेत. महापालिकेचे साहाय्यक आयुक्त तर आता मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळू लागले आहेत. तक्रारी घेऊन येणाºया नागरिकांना पोलिसात तक्रारी करण्यास सांगून आपली जबाबदारी झटकू लागले आहेत.
त्यामुळे ही कीड तात्काळ मरेल, अशी अपेक्षा करणेही चुकीचे! कारण या भ्रष्टाचाराच्या किडीने महापालिकेच्या शिपायापासून वरिष्ठ अधिकाºयांना मालामाल केले आहे.
आता या भ्रष्टाचाराला सुरुंग लावण्याचे काम केले आहे; ते शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी! मुळात वसई-विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून विरोधक असा नावालाही कुणी नव्हता. परिणामी महापालिकेचा कारभार एककल्लीच राहिला. कोणी विचारणारा, विरोध करणारा, महापालिका प्रशासनावर वचक आणणारा नाही म्हटल्यावर या भ्रष्टाचाराला उधाण आले.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकांनी महापालिकेला नवी दिशा दिली. धनंजय गावडे यांच्या रूपाने धडाडीचा नगरसेवक महापालिकेत आला. अभ्यासू, चिकित्सक असलेल्या धनंजय गावडे यांनी पदार्पणातच महापालिकेतील भ्रष्टाचाराला सुरुंग लावला. त्यामुळे कधी नव्हे; ते मागील एक वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली. या सगळ्यावर कडी केली; ती नगररचना विभागाच्या उपसंचालक वाय. शिवा रेड्डी यांच्या प्रकरणाने!
याचाच अर्थ वसई-विरार महापालिकेच्या रक्तात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला होता, हे स्पष्ट होते. या पदावर रेड्डी तब्बल १२ वर्षे होते, त्यातून त्यांनी किती माया जमवली असेल, हा विचार अस’होतो. आज वसई-विरारमधील मोठमोठ्या इमारतींना कोणत्याही परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत. तरीही या इमारती दिमाखात उभ्या आहेत. याचाच अर्थ पैसा सगळीकडे पोहोचला आहे. पुढे जाऊन या इमारती अनधिकृत ठरवल्यास गंडांतर येईल ते सामान्य नागरिकांवर! पण काही का प्रमाणात आयुक्त आणि धनंजय गावडे यांनी या सगळ्याला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे.
रेड्डी यांच्या प्रकरणात पुढे जाऊन अधिक खुलासा होईलच! या प्रकरणातून अनेकानेक प्रकरणे आणि त्यासोबत जोडलेली नावे बाहेर येतील. तोपर्यंत आयुक्त सतीश लोखंडे आणि शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी वसई-विरारकरांना आणि त्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे, असेच म्हणावे लागले!