

वसई : (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या निष्काळजी आणि उदासिन धोरणामुळे कामण येथील पिराच्या तलावाचे काम रखडले आहे. सन 2015 सालापासून पिराच्या तलावाचे काम रखडले असल्याने स्थानिक नगरसेवीका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. येत्या 8 दिवसात पिराच्या तलावाचे काम सुरू न केल्यास तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकल्यास कोणतीही पूर्वसुचना न देता वसई विरार महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी पालिकेला दिला आहे.
कामण-पिराच्या तलावाच्या कामासाठी ठेकेदाराला देणे असलेले पेमेंटपालिकेने तात्काळ थांबवावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे. निष्काळजी ठेकेदार वगळून त्याच्याठिकाणी नवा ठेकेदार नेमण्याची मागणी म्हात्रे यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी केलेल्या बाबींचा पालिकेने गांभिर्याने विचार न केल्यास शिवसेना स्टाईलने ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी दिला आहे.