
नालासोपारा :- गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी सामाजिक सुधारणा या उत्सवाच्या मूळ हेतूला कधीही धक्का लागू दिला नाही. उलट हा उत्सव सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक कसे ठरेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सध्या या उत्सवाचे स्वरूप ग्लोबल झाले असले तरी समाज एकत्र आणण्याची मूळ प्रेरणा हा उत्सव आजही जपत आहे. अशा परिस्थितीत उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल आणि ‘समाजप्रबोधना’चा मूळ धागा कुठेही उसवणार नाही याची दक्षता गणेश मंडळे आणि त्यांना सतत प्रोत्साहित करणाऱ्या गणेशभक्तांना घ्यावीच लागेल. मिरवणुकीचे स्वरूप ‘सेलिब्रेशन’ आणि ‘दणदणाट’ याकडे झुकले होते. मात्र ‘डीजे’चा दणदणाट ही वसईतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची ओळख कधीच नव्हती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर ती राहणार नाही.
डीजेचा आवाज किती ?
न्यायालयाच्या निर्देशानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसाला ७५ डेसीबल तर रात्रीला ७० डेसीबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसाला ६५ रात्रीला ५५, रहिवासी क्षेत्रात दिवसाला ५५ रात्रीला ४५ तर शासनाने घोषित केलेल्या सायलन्स झोन म्हणजेच शाळा, न्यायालय, रुग्णालय परिसरात दिवसाला ५० तर रात्रीला ४० डेसीबलच्या मर्यादेत डीजेचा साउंड असला पाहिजे.
किती आवाजाला शहरात परवानगी ?
वसईत ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार ५५ डेसीबल पर्यंतच्या आवाजाची मर्यादा घालून दिलेली आहे. तेवढ्याच आवाजाची इतर वेळेला परवानगी आहे. पण गणेश उत्सवाच्या दरम्यान डीजेला परवानगी नाही आहे.
पोलिसांची परवानगी आहे का ?
शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री चे आगमन व विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे. तीन ते चार दिवस मिरवणूक निघणार आहेत. त्यासाठी गणेशोत्सव मंडळे स्थानिक पोलीस ठाण्यात मिरवणूक व साऊंड सिस्टीमसाठी परवानगी मागण्याची सुरुवात केली आहे. पोलिसांनी डीजेला परवानगी नाकारली आहे.
ह्वदयरोग्यांना, लहान मुलांना त्रास
सामान्यतः डिजेचा आवाज हा १५० डेसीबलपेक्षा अधिक असल्याने त्या कर्णकर्कश आवाजाने काहींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. वृद्ध आणि लहानग्यांना सुद्धा त्या आवाजाने कानाचे आजार होण्याची शक्यता असते. ध्वनीप्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणेे, कानात दडे बसणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयविकाराच्या तक्रारी निर्माण होणे, अशा प्रकारचे त्रास होतात.
तज्ज्ञ डॉक्टरची प्रतिक्रिया
शहरवासियांची पंचेंद्रिये आणि विशेषतः कर्णेंद्रिये निकामी होत आहेत. गरोदर स्त्रियांनाही गोंगाटाचा पुष्कळ त्रास होतो आणि मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच अकाली प्रसूती होण्याचे प्रकार घडतात. ध्वनीप्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना या काळात जगणे नकोसे होते. त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. – डॉ. संदीप सरताळे
कोट
मिरवणुकीत सर्वच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषण नियमाचे पालन करावे लागणार आहे. जर कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. वसईत डी जे ला परवानगी नाही आहे. प्रत्येक मंडळांनी व कार्यकर्त्यांनी कटू प्रसंग टाळून उत्सव साजरा करावा. – संजयकुमार पाटील (पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन)