
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जि. प. सदस्य समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली तगाई कर्जामुळे आकारपडीत झालेल्या जमिनीसंदर्भात वसईतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांना भेटले.
1948 साली चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तगाई कर्ज दिले गेले परंतु परतफेड न केल्यामुळे 1963 च्या दरम्यान ही सर्व शेती सरकारी आकारपडीत म्हणून सातबाऱ्यावर नोंद झाली होती. त्यातच 1989 साली महाराष्ट्र सरकारने सर्वसकट तगाई कर्जमाफी दिली होती. तरीही सातबाऱ्यावरील सरकारी आकारपडीत नोंद रद्द होऊन मूळ शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर यावी म्हणून मागील कित्येक वर्षे शेतकरी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही ही शेतकऱ्यांची कैफियत यावेळी समीर वर्तक यांनी माननीय महसूलमंत्री महोदयांजवळ मांडली.
यावर लवकरच कॅबिनेट बैठकीत हा विषय घेऊन शेतकऱ्यांचे काम मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन माननीय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दिले. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मा. मोहन जोशी यांचेही मार्गदर्शन लाभले.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात समीर वर्तक यांच्यासोबत वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, शेतकरी फ्रान्सिस मस्करण, ऑगस्तिन (नाना) मस्करण, कुंदन नाईक, संदीप किणी, देवेंद्र पाटील, वसई विरार जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अम्मार पटेल, अभिजित घाग, डेरीक फुरटॅडो, आमिर देशमुख आणि तारिक खान हे उपस्थित होते.

