
सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना सुचवला पर्याय
विरार : वसई-विरार शहरात चांगल्या दर्जाची रुग्णालये नसल्याने ‘कोरोना’सारख्या संकटकाळात वसई-विरार महापालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णत: उघडी पडली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी विरार पश्चिम यशवंत नगर येथील निर्माणाधिन बस डेपो इमारतीचे रुग्णालयात रूपांतरण करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केली आहे.
आयुक्त गंगाथरन डी. या सूचनेवर सकारात्मकता दाखवल्यास अवघ्या सहा महिन्यांत वसई-विरार शहराला कायमस्वरूपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिळेल, असा ठाम विश्वास चरण भट यांनी व्यक्त केला आहे. या सूचनेचे पत्र त्यांनी आयुक्तांसह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय- दिल्ली यांनादेखील पाठवले आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत वसई-विरार महापालिकेला १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून वसई-विरार शहरात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामात विरार पश्चिम यशवंत नगर येथे निर्माणाधिन असलेल्या बस डेपोचाही समावेश आहे.
या बस डेपोसाठी जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजना व स्वतःच्या सहभागाने वसई-विरार महापालिकेने १३० कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक बनवले आहे. एनए या बांधकाम व्यावसायिक कंपनीकडून या बस डेपोचे बांधकाम करण्यात येणार असून; या बहुमजली इमारतीत विविध आस्थापने असणार आहेत.
मागील पाच वर्षे सुरू असलेल्या या डेपोसाठी वसई-विरार महापालिकेने आतापर्यंत ९० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र वसई-विरार महापालिकेची डबघाईला आलेली आणि दर्जाहीन परिवहन सेवा लक्षात घेता; इतक्या मोठ्या इमारतीची बस डेपोसाठी गरज वाटत नाही. नागरिकांना आज १३० कोटीच्या बस डेपोची नाही; तर १३० कोटीच्या महापालिकेच्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची गरज आहे, असे मत चरण भट यांनी व्यक्त केले आहे.
त्यापेक्षा २५ लाख लोकसंख्येच्या वसई-विरार शहरासाठी या बहुमजली इमारतीला रुग्णालयात रूपांतरीत करण्याच्या दृष्टिकोनातून खर्च करावा. या इमारतीचे स्ट्रक्चर तयार असून; तिच्या अतंर्गत बांधकामावर खर्च केल्यास वसई-विरार शहराला अवघ्या सहा महिन्यात किमान १५०० ते २००० रुग्ण क्षमतेचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिळेल. त्यामुळे वसई-विरार शहरातील हजारो रुग्णाचे मुंबईतील हॉस्पिटलवर असलेले अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान; या महत्त्वपूर्ण मागणीचा तातडीने विचार व्हावा व हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी चरण भट यांनी आयुक्तांसह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय-दिल्ली यांनादेखील पत्र दिले आहे.
चंदनसार येथील येथील रखडलेल्या आरोग्य केंद्राचाही विचार करावा !
वसई-विरार महापालिकेच्या चंदनसार येथील आरोग्य केंद्राचे काम मागील काही वर्षे रखडले आहे. या आरोग्य केंद्राचे काम मार्गी लागल्यास या ठिकाणी किमान १०० रुग्ण क्षमतेचे रुग्णालय तयार होईल. तेव्हा यावरही आयुक्त गंगाथरन डी. यांनी विचार करावा, अशी विनंतीही या पत्रात चरण भट यांनी केली आहे.