
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
नालासोपारा :- वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक पांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे केली आहे.
वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी तहसीलदारपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांत वसई तहसील कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे. उज्ज्वला भगत यांच्या भ्रष्ट कारभाराला वसईतील नागरिक कंटाळले आहेत. तहसीलदारांच्या वरदहस्तामुळेच वसई महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेले नायब तहसीलदार प्रदीप मुकणे व मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी होणे आवश्यक असून त्यांच्याबरोबरच वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांना जबाबदार धरून त्यांच्यादेखील मालमत्तेची सखोल चौकशी केल्यास अनेक गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र अशोक पांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले तसेच पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांना दिले आहे.
वसई तहसीलदारांच्या भ्रष्ट कारभारामुळेच वसई पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात माती उत्खनन व माती भराव सुरू आहेत. वसईच्या तहसीलदारांच्या अप्रत्यक्ष संरक्षणामुळेच बेकायदा माती भराव करणारे भूमाफिया शासनाचे करोडो रुपयांचे स्वामित्व धन बुडवत आहेत. माती उत्खनन व माती भरावासाठी ठराविक ब्रासची परवानगी घेऊन हजारो ब्रास माती भराव होत आहे. त्यामुळे वसई पूर्व भागातील माती भरावासाठी वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यामार्फत देण्यात आलेल्या परवानग्यांची सखोल चौकशी
केल्यास तथा माती उत्खनन व माती भराव परवानगीचे टेबल सांभाळणार्या लिपिकाची चौकशी केल्यास अनेक गंभीर बाबी उघड होतील, असे अशोक पांडे यांचे म्हणणे आहे.
कोट
१) कोण आहे मी त्याला ओळखत नाही. त्याचे कोणते काम होते, कोणते काम केले नाही, त्यांना कोणता त्रास दिला आहे. कोणी काहीही बोलले, मी केलेल्या कामाबाबत नागरिकांना विचारा. एखादा अधिकारी चांगला काम करत असेल तर त्याचे खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. त्यांना जर तक्रार करून खुशी मिळत असेल तर बिनधास्तपणे करावी. – उज्वला भगत (तहसीलदार, वसई)