
नालासोपारा :- नागरिकांच्या सोयीसाठी एखाद्या शासकीय कार्यालयात अन्य शासकीय संस्थेला जागा देणे डोकेदुखी ठरली आहे. भटाला दिली ओसरी.. या म्हणीचा प्रत्यय सध्या वसई तहसीलदार कार्यालयामध्ये येत आहे.
वसई तहसीलदार कार्यालयामध्ये सह दुय्यम निबंधक वर्ग २, वसई क्रमांक ६ हे एकमेव नोंदणी कार्यालय आहे. या कार्यालयाचे काही दिवसांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरण प्रक्रियेनंतर सदर कार्यालयाचा पसारा कार्यालया बाहेर आलेला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे कारण देत येथील व्यवस्थापनाने तहसीलदार कार्यालयाच्या जाण्या येण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केलेले आहेत.
निरुपयोगी सामान व नवीन बसण्याची आसने, लिखाणाचे स्टॅन्ड यांचे अतिक्रमण वाढले आहे. विशेष म्हणजे याकरता तहसीलदार कार्यालयाची कुठल्या स्वरूपाची परवानगी सदर कार्यालयाने घेतलेली नाही.
हे कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार होतं परंतु, वसईतील नागरिकांना दस्त नोंदणीसाठी सोयीच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय तहसीलदार कार्यालयातच सुरू ठेवण्यात आले.
मागील काही काळापासून हे कार्यालय विविध बेकायदेशीर व्यवहारांमुळे यापूर्वी चर्चेत आलं होतं. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी या कार्यालयात विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिक , अपंग यांना आजही या कार्यालयात आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. तरी अधिकारी वर्गाने स्वतःसाठी सुविधा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून आलेला निधी सदर कार्यालयाच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला. सदर कार्यालयाचे नवीन जुने, सामान आता मंडळ अधिकारी, वसई यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी विविध कामांकरता येणाऱ्या नागरिकांना येथील अडथळ्यांची शर्यत पार करून मार्गक्रमण करावे लागत आहे.
सदर बाबत सह दुय्यम निबंधक केकन यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर अतिक्रमणाची बाब मान्य केली तसेच येथून अनावश्यक सामान लवकरच हटवण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.